विधान परिषद निवडणुक : मनसे तटस्थ राहणार, काँग्रेसला होणार फायदा

December 11, 2015 9:13 PM0 commentsViews:

vidhan

11 डिसेंबर : या महिन्याअखेरीस होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईतील दोन जागांसाठी मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. मनसेच्या 28 नगरसेवकांच्या मतांवर डोळा असणार्‍या उमेदवारांची मात्र आता मोठी पळापळ होणार आहे. मनसेच्या या निर्णयाचा काँग्रेसला फायदा होणार आहे, तर भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. तर अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांनाही तगडी लढत द्यावी लागणार आहे. मनसेनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 8 जागांसाठी 27 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मुंबई महापालिकेच्या दोन जागा आहेत. शिवसेनेतर्फे शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुंबई महापालिकेत एकूण 227 नगरसेवक आहेत त्यात शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ 75 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे या जागेवर रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे केवळ दुस-या जागेबाबत उत्सुकता आहे.

दुसर्‍या जागेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप, भाजपकडून मनोज कोटक तर राष्ट्रवादीचे नेते प्रसाद लाड यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत. तर भाजपकडे 32 नगरसेवक आहेत. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना मनसे व सपाच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र, मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने भाई जगतापांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close