…तर स्मार्ट सिटी योजनेला आग लावा,सेनेचाही विरोध

December 14, 2015 9:51 AM0 commentsViews:

uddhav on modi_land_bill14 डिसेंबर : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेला आता शिवसेनेनंही विरोध केलाय. स्मार्ट सिटीनामक जो काही आराखडा समोर आणला जातोय तो भांडवलदार, व्यापारी व बिल्डरधार्जिणा आहे हे आम्ही मुंबईच्या बाबतीत तरी ठामपणे सांगू शकतो. या स्मार्ट सिटीत मुंबईतला सामान्य माणूस, भूमिपुत्र नसेल तर आग लावा तुमच्या त्या विकासाला ? अशी टीका शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून केलीये. तसंच असा डाव कुणी रचत असेल तर शिवतीर्थावरील शिवरायांच्या हातातील तलवार त्यांनी पाहून घ्यावी. मराठवाड्यातील औरंगजेबाचे थडगेही पाहावे आणि मुंबईतल्या 105 हुतात्म्यांच्या स्मारकावर फेरफटका मारून यावे. म्हणजे आम्हाला काय सांगायचे आहे ते कळेल असा इशाराही देण्यात आलाय

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्मार्ट सिटी योजना ही फसवी योजना असून राजकीय फायद्यासाठी ती राबवली जात आहे अशी टीका केली होती. आपला या योजनेला विरोध आहे असंही राज यांनी जाहीर केलं होतं. आता शिवसेनेनंही स्मार्ट सिटीला विरोध करत एनडीएला पुन्हा घरचा अहेर दिलाय. आजच्या ‘सामना’तून सेनेनं स्पष्ट भूमिका मांडलीये. स्मार्ट सिटीनामक जो काही आराखडा समोर आणला जातोय तो भांडवलदार, व्यापारी व बिल्डरधार्जिणा आहे हे आम्ही मुंबईच्या बाबतीत तरी ठामपणे सांगू शकतो. या स्मार्ट सिटीत मुंबईतला सामान्य माणूस, भूमिपुत्र नसेल तर आग लावा तुमच्या त्या विकासाला ?, अशी टीका सेनेनं केलीये.

तसंच स्मार्ट सिटीच्या नावाखाली मुंबईच्या विकासावर नियंत्रण ठेवणारे स्पेशल पर्पज व्हेईकल बोर्ड निर्माण होईल आणि ही एकप्रकारे कॉर्पोरेट धर्तीची खासगी कंपनी असेल. म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबईर् ही एकप्रकारे केंद्रशासित किंवा केंद्राची वसाहत होईल. थोडक्यात मुंबईच्या ‘माथी’ नवे अंडरवर्ल्ड म्हणजे समांतर सरकारच मारण्याचा हा प्रकार आहे. मुंबईला मागच्या दाराने केंद्रशासित करण्याचा डाव कुणी रचत असेल तर शिवतीर्थावरील शिवरायांच्या हातातील तलवार त्यांनी पाहून घ्यावी. मराठवाड्यातील औरंगजेबाचे थडगेही पाहावे आणि मुंबईतल्या 105 हुतात्म्यांच्या स्मारकावर फेरफटका मारून यावे. म्हणजे आम्हाला काय सांगायचे आहे ते कळेल. असा शिवसेना स्टाईलने दमही या अग्रलेखातून देण्यात आलाय. एकूणच स्मार्ट सिटी योजना राबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असताना या योजनेतही शिवसेनेनं खोडा घालून कुरघोडीचं राजकारण करण्याचा शिरस्ता कायम ठेवलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close