मुंबईच्या ‘क्विन नेकलेस’ला 100 वर्षं पूर्ण

December 18, 2015 5:32 PM0 commentsViews:

उदय जाधव, मुंबई

18 डिसेंबर :  मुंबईचा मरीन ड्राईव्ह… देशातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. याच मरीन ड्राईव्हच्या बांधकामाला आज शंभर वर्षे पुर्ण होत आहेत. मरीन ड्राईव्हला मुंबई शहराचं वैभव आणि भूषण म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच या मरीन ड्राईव्हला क्विन नेकलेस म्हणजेच राणीचा रत्नंहार या नावाने ओळख निर्माण झाली. मरीन ड्राईव्हच्या या शंभर वर्षाच्या इतिहास सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट…

marine Drive13
मरीन ड्राईव्ह… आधी हा महाराणीच्या गळ्यातला ताईत होता… आता हा आधुनिक भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा मुकुट बनला आहे. स्वप्ननगरीचा हा आत्मा आहे. शंभर वर्षांपूर्वी बरोबर आजच्या दिवशी याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. 18 डिसेंबर 1915या दिवशी मरीन ड्राईव्हची पहिली वीट ठेवण्यात आली होती.

शंभर वर्षांपूर्वी इथे समुद्र किनारा होता. तेव्हा गिरगाव चौपाटी ते चर्चगेट असा कोस्टल रोड बांधण्याचं काम ब्रिटीश सरकारने हाती घेतलं. या कामी स्थानिक कंत्राटदार, ठेकेदार आणि भूमिपुत्रांना रोजगार निर्माण झाला. त्यांनी पुढील पाच वर्षात हा कोस्टल रोड बांधून पुर्ण केला. त्यांनतर स्वतंत्र भारतात साठ आणि सत्तरच्या दशकात चर्चगेट ते आत्ताचं नरीमन पॉइंट पर्यंत भराव टाकून हा कोस्टल रोड वाढण्यात आला.

मरीन ड्राईव्ह जसा आर्थीक सामर्थ्याचं प्रतीक बनला. तसाच तो बॉलिवूडचा फेव्हरेट झाला नसता तरचं नवल. याच मरीन ड्राईव्हच्या कट्‌ट्यांवर अनेकांच्या जन्माच्या गाठी जुळल्या… जो मरीन ड्राईव्ह छत्रीच्या आड मारलेल्या प्रेमळ गप्पांचा साक्षीदार असतो. तोच एकांताच्या क्षणी मनाला अथांग शांतता देतो… इथे मॉर्निंग वॉक, इथेच मॅरेथॉन, इथे कॉफी, इथेच मसाज… इथे लहानग्यांचं निरागस बागडणं, इथेच मित्रांसोबत बिनधास टवाळकी.. इथे गणेश विसर्जन… इथेच सामर्थ्याचं प्रदर्शन… बारा लाख लोकं एकाच वेळेला सामावून घेईल अशी ही जगातली कदाचित सगळ्यात मोठी प्रेक्षागॅलरी. शंभर वर्षांत या मरीन ड्राईव्हने हजारो सूर्यास्त पाहिले, पण मनाने तो नेहमीच तरुण राहिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close