‘ती’ने कॉलेजमध्ये लावलं सॅनिटरी नॅपकिन्सचं व्हेंडिंग मशीन !

December 21, 2015 3:16 PM0 commentsViews:

21 डिसेंबर : केरळमधल्या हॅपी टू ब्लीडनंतर महिलांच्या पाळीच्या विषयावरुन देशभर चर्चा झाली. त्यानंतर शनि शिंगणापूरच्या चौथर्‍यावर महिला चढल्यानंतर वादळ निर्माण झालं. देशातल्या या प्रतिगामी वृत्तीच्या लोकांना मुंबईतल्या सेंट झेवियर्स कॉलेजमधल्या एका विद्यार्थिनीने आपल्या कृतीतून सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने चक्क तिच्या कॉलेजमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सचं व्हेंडिंग मशीन आणून बसवलं आहे.vending_story

पाळी आणि सॅनिटरी नॅपकिनबद्दल कुणी जाहीरपणे बोलत नाही. मेडिकल स्टोअर्समध्येही नॅपकिन कागदात गुंडाळून देतात. पण सॅनिटरी नॅपकिनमध्ये लपवण्यासारखं काहीच नाही, हा संदेश श्रेया माथुरने दिला आहे. सॅनिटरी नॅपकिन्स स्वस्त आणि सहज उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रॅक्टिकल हेतू आहे. हे मशिन कॉलेजमध्ये बसवलं, त्या दिवशी सगळ्या मुलींनी एकमेकींना ‘विश यु हॅपी पिरिअडस्’ अशा वेगळ्या आणि हटके शुभेच्छाही दिल्या. झेविअर्सच्या महिला विकास कक्षामार्फेत श्रेया माथूर हिने कॉलेजमध्ये सॅनिटरी व्हेन्डिंग मशिन लावणं आवश्यक असल्याचं पत्र व्यवस्थापनाला दिलं.

कॉलेजकडून होकार आल्यानंतर कॅम्पसमध्ये स्वच्छतागृहात ही मशिन्स बसवण्यात आली, तिचं प्रात्यक्षिक देण्यात आलं. वापरण्यासाठी सुटसुटीत, सोयीची असलेली मशिन्सची माहिती अधिकाअधिक पोहचवण्याची जबाबदारी विद्यार्थी आणि विद्याथीर्ंनी घेतली, व्हॉटस्‌ऍप,फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मैत्रीणींना, इतर कॉलेजमधील मित्रांना ही माहिती फॉरवर्ड केली. सार्वजनिक ठिकाणी अशा सॅनिटरी नॅपकिन्सच्या व्हेंडिंग मशिन्स लागल्या तर अनेक जणी विनासंकोच, होय आता माझी पाळी, असं म्हणू शकतील यात काही शंका नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close