राम मंदिरासाठी लागणार्‍या शिला अयोध्येत दाखल

December 21, 2015 3:25 PM0 commentsViews:

Ayodhya Shila12

21 डिसेंबर : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीच्या चर्चेला उधाण आलं असून, विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनानुसार राजस्थानातून दोन ट्रक शिला अयोध्येत दाखल झाल्या आहेत. रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यदास यांच्या हस्ते त्याचं शिला पूजनन करण्यात आले. तसंच मोदी सरकारकडून आताच राममंदिर बांधण्याचे संकेत मिळाले आहेत, असा दावाही महंत नृत्यगोपाल दास यांनी केला.

अयोध्येत राम मंदिर उभारण्याची घोषणा विश्व हिंदू परिषदेने केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच मंदिर उभारणीसाठी शिला येऊ लागल्या आहेत. रविवारी धक्कादायकरीत्या राजस्थानातून दोन ट्रक शिला अयोध्येतील रामसेवक पुरम इथं आणण्यात आल्या. त्यानंतर महंत नृत्यगोपाल दास यांच्याहस्ते शिला पूजन करण्यात आलं, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी दिली. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर राम मंदिर उभारणीचे संकेत मिळाले आहेत. तसंच मंदिर उभारणीची योग्य वेळ आली आहे. त्यासाठी अयोध्येत देशभरातून शिला दाखल होत असल्याचे महंत नृत्य दास यांनी म्हटलं आहे. अयोध्येत अनेक भागातून शिला येत असून, हे सत्र सुरूच राहील, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, अयोध्येत अचानक सुरू झालेल्या या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस सतर्क झाले असून, अयोध्येतील प्रत्येक बारीक सारीक घडामोडींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. शिळा अयोध्येत आलेल्या आहेत आणि त्या खासगी जागेत ठेवल्या आहेत, याला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. कोणतीही अनुसूचित घटना घडू नये, यासाठी वादग्रस्त रामजन्मभूमी परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसंच जर शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला गेला, तर कारवाई केली जाईल, असा इशारा फैजाबादचे पोलीस अधीक्षक मोहित गुप्ता यांनी दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close