राम जेठमलानी मांडणार अरुण जेटलींच्या विरोधात बाजू

December 21, 2015 9:29 PM0 commentsViews:

21 डिसेंबर : दिल्ली क्रिकेट असोसिएनशन प्रकरणाचे पडसाद आज संसदेतही उमटले. गेली 13 वर्षं डीडीसीएचे अध्यक्ष असलेल्या अरूण जेटली यांनी राजीनामा द्यावा या मागणीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहं बंद पाडली. तर अरुण जेटलींनी पतियाळा हाउस कोर्टात जाऊन आप नेत्यां विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. विशेष म्हणजे राम जेठमलानी हे कोर्टात अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडणार आहेत.

ram jaitmalai bannert

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये डीडीसीए प्रकरणावरून गदारोळ झाला. सभागृहांचं कामकाज सुरु होताच विरोधकांनी जेटलींच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज बंद पाडलं. मात्र, अरुण जेटली यांनी स्वत:वरचे आरोप फेटाळले, त्याचवेळी त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी अडचणीत आल्यानंतर सत्ताधार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे विरोधक चांगलेच सुखावलेत. त्यामुळेच की काय, पण विरोधक हा मुद्दा सहजासहजी सोडायला तयार नाहीत. त्यामुळेच ते जेटलींच्या राजीनाम्यावर ठाम होते.

या मुद्द्यावरून राज्यसभा चार वेळा तर लोकसभा एकदा स्थगित झाली. या नंतर जेटली अर्ध्या डझन केंद्रीय मंत्री, खासदार आणि समर्थकांची फैज घेऊन पतियाळा हाऊस कोर्टात गेले, त्यांनी अरविंद केजरीवाल आणि टीमविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकला. विशेष म्हणजे एनडीएचे कायदेमंत्री म्हणून काम पाहिलेले राम जेठमलानी कोर्टात अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडणार आहेत. या प्रकरणी पुढची सुनावणी 5 जानेवारीला होणार आहे. केजरीवाल विरुद्ध जेटली या लढाईमुळे, हिवाळी अधिवेशन संपता संपता काँग्रेस आणि विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close