दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला उद्या मिळाणार केंद्राची मदत – नाना पटोले

December 22, 2015 6:24 PM0 commentsViews:

patole134

22 डिसेंबर : केंद्राच्या मदतीकडे डोळे लावून बसलेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी उद्या (बुधवारी) केंद्र सरकारच्यावतीने भरीव मदतीची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा खासदार नाना पटोले यांनी आज (मंगळवारी) दिली.

सलग चार वर्षांपासून महाराष्ट्रातील मराठवाडा-विदर्भासह अन्य भागात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येऊन महिना उलटला तरी अद्यापही केंद्राकडून मदतीची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे दुष्काळी जनता हवालदिल झाली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा खासदारांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेऊन त्यांना दुष्काळी जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर उद्याच (बुधवारी) दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन जेटली यांनी दिलं. तसंच ही मदत अन्य राज्यांच्या तुलनेत भरीव स्वरूपाची असेल, असंही जेटलींनी सांगितल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून किती मदत घोषीत होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close