नक्षलवाद्यांचे बिहारमध्ये 10 बळी

February 18, 2010 2:21 PM0 commentsViews: 2

18 फेब्रुवारी देशभरात ठिकठिकाणी नक्षलवाद्यांकडून हल्ले होत आहेत. पश्चिम बंगालमधील सिलदाह इथे 2 दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 24 सुरक्षाजवान ठार झाले होते. 10 नागरिकांचा बळी तर बुधवारी बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी जमुई जिल्ह्यातील फुलवारिया गावावर केलेल्या हल्ल्यात 10 निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. 150हून अधिक सशस्त्र नक्षलवाद्यांनी या गावावर हल्ला केला. राजधानी पाटण्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावाला घेराव घालत या नक्षलवाद्यांनी गावकर्‍यांवर गोळीबार केला. तसेच काही घरांना आगही लावली. यावेळी नक्षलवाद्यांनी 3 लहान मुलांनाही ओलीस ठेवले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. नक्षलवाद्यांना या गावाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लालगडमध्ये 2 नक्षलवादी ठारमिदनापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आज लालगड येथील धरमपूरच्या निमलष्करी दलाच्या कॅम्पवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. इथे नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये बराच वेळ चकमक झाली. त्यात 2 नक्षलवादी ठार झाले. देशाला अतिरेकी हल्ल्यांचा धोका कायम असतानाच, देशांतर्गत सुरक्षेला नक्षलवाद्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.'मवाळ भूमिका घ्या'एकीकडे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलिसांसह निष्पाप नागरिकांचा बळी जात आहेत. तर दुसरीकडे मात्र नक्षलवाद्यांविरोधात कडक भूमिका घेतली जाऊ नये, असा आग्रह धरला जात आहे. केंद्रातील यूपीए सरकारचा घटकपक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी अशी आग्रहाची मागणी केली आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी होणार्‍या राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नक्षलवाद्यांबाबत मवाळ भूमिका घ्यावी. नक्षलवाद्यांकडून होणार्‍या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करण्यापुरताच हा मुद्दा भाषणात मांडला जावा, असेही ममतांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर, नक्षलींच्या वाढत्या हल्ल्यांसाठी पश्चिम बंगाल सरकारला जबाबदार धरले जावे, अशीही ममता ममता यांची इच्छा आहे. आणि विशेष म्हणजे कॅबिनेट बैठकीत ममता यांच्या या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यानुसार, वाढत्या नक्षली हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत, हे हल्ले रोखण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आपल्या भाषणातून करणार आहेत.शिबू सोरेनही मवाळ ममता बॅनर्जी यांच्यासोबतच झारखंडचे मुख्यमंत्री शिबून सोरेन यांनीही नक्षलवाद्यांविरोधात काहीशी मवाळ भूमिका घेतली आहे. माओवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या एका सरकारी अधिकार्‍याच्या सुटकेसाठी तुरुंगात असलेल्या काही माओवादी नेत्यांची सुटका करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशांतकुमार लायक या सरकारी अधिकार्‍याचे माओवाद्यांनी शनिवारी दाल्बुमगड इथून अपहरण केले होते. त्याच्या सुटकेसाठी माओवाद्यांनी त्यांच्या काही नेत्यांच्या सुटकेची मागणी झारखंड सरकारकडे केली होती. या माओवादी नेत्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

close