घोटाळेबाज महेश मोतेवार फरार आरोपी

December 24, 2015 8:51 AM0 commentsViews:

Mahesh-Kisan-Motewar24 डिसेंबर : समृद्ध जीवनच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातल्या लाखो नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली करोडो रुपयांचा गंडा घालणार्‍या महेश किसन मोतेवारचा आणखी एक पराक्रम उघड झालाय. उस्मानाबाद पोलिसांच्या रेकॉर्डला फरार आरोपी म्हणून महेश मोतेवारचं नाव आहे. त्याच्याविरोधात कलम 420 खाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नेहमी व्हीआयपी नेते आणि राजकीय पुढारी यांच्यासोबत खुलेआम फिरणारा महेश मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना गेल्या 2 वर्षांपासून सापडत नाही. त्यामुळे पोलीस मोतेवारला अभय तर देत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित राहिलाय.

महेश मोतेवारवर उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिस ठाण्यात 420 , 448 , 427 , 491 34 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. दूध डेयरी प्रकल्पमध्ये भागीदारी देण्याचे अमीष दाखवून सांगली आणि लातूर येथील तीन जणांना 35 लाख रुपयांना
फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर मुरूम पोलिसांनी सखोल तपास करून या प्रकरनात तथ्य आढळल्याने गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास करून मुरूम पोलिसांनी उमरगा येथील कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल करताना मोतेवारला फरारी घोषित केले. सुमारे 3 वर्ष कालावधी लोटला तरी महेश मोतेवारला फसवणुकीच्या गुन्ह्यात अजुन उस्मानाबाद पोलीस अटक करू शकले नाहीत. त्यामुळे मोतेवार पोलिसांना सापडत नव्हता का पोलिसांना तो माहीत असून सुद्धा शोधायचा नव्हता हा प्रश्न सामान्य नागरिकांना समोर पडला आहे.

महेश मोतेवारने उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगुर येथे दूध डेयरीच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक केली आहे. सध्या ही दूध डेयरी बंद असून सामान आणि मशनरी धूळखात पडून आहे.

खुले आम टीव्ही चॅनेलवर दिसणारा महेश मोतेवार हा फरार आहे. यावर फसवणूक केलेल्या फिर्यादी पक्षाच्या वकिलांना आश्चर्य वाटत असून त्याला तत्काळ बेडया ठोकाव्या अशी मागणी वकील एस एस राजेश्वरकर यांनी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close