सांगलीत दाम्पत्याची दोन मुलांसह आत्महत्या

December 28, 2015 8:05 PM0 commentsViews:

Sangli sucide

28 डिसेंबर : सावकारी पाशाला कंटाळून सांगली जिल्हात एकाच शेतकरी कुटुंबातल्या चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील बनेवाडी गावात पती-पत्नीने आपल्या पोटच्या मुलांना विष पाजून त्यानंतर स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. सावकाराच्या कर्जातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतो आहे.

इस्लामपूरजवळ असलेल्या बनेवाडीत इथे राहणार्‍या संजय यादव यांची चार एकर शेती होती. यादव यांनी खाजगी सावकाराकडून पाच लाख रुपये घेतले होते. पण अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करूनही सावकाराकडून तगादा सुरुच होता. कर्जासाठी यादव कुटुंबियांनी त्यांच्याकडील सर्व शेती विकली. त्यानंतरही कर्जाची रक्कम आठ लाख रुपये शिल्लक असल्याचं सावकारानं सांगीतलं. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी दुसर्‍याच्या शेतात मजूरी केली, बेकरीचा व्यवसायही सुरु केला, पण तरीही सावकाराची मागणी सुरुच होती. पैसै परत न केल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

अखेरीस काल म्हणजे सोमवारी पहाटेच्या सुमारास संजय आणि जयश्री या दोघांनी राजवर्धन आणि समृद्धी या आपल्या दोन्ही मुलांना विष पाजले. त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. यानंतर या दोघांनीही गळफास लावून घेत आत्महत्या केली. शेजारच्या लोकांमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. सावकाराच्या कर्जामुळे ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या प्रकरणाचा इस्लामपूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close