केंद्राकडून राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी 3050 कोटींची मदत जाहीर

December 29, 2015 7:56 PM0 commentsViews:

Drought1

29 डिसेंबर : राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमिवर राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारचा निधी जाहीर झाला आहे. केंद्राकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी 3050 कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलं आहे. दिल्लीत झालेल्या एनडीआरएफच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या मदतीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ नेत्यांची आज (मंगळवारी) एक बैठक नवी दिल्लीमध्ये झाली. या बैठकीला अर्थमंत्री अरूण जेटली, कृषिमंत्री राधामोहन सिंह उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राला 3050 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला.

मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाची भयाण परिस्थिती आहे. आधी दुष्काळ त्यानंतर अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यात गेल्या 4 वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. यावर्षीही केंद्र सरकारकडून उशिरा मिळालेली मदत आणि राज्य सरकारकडून मिळालेली मदत पुरली नाही. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील अधिकार्‍यांच्या एका समितीने राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. या समितीचा अहवाल सरकारपुढे सादर झाल्यानंतर ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्राने दिलेला निधी तुटपुंजी असून, केवळ तोंडाला पाने पुसण्यासारखे असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close