विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सरशी

December 30, 2015 12:37 PM0 commentsViews:

congress_flag30 डिसेंबर : विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. विधान परिषदेच्या या आखाड्यात काँग्रेसने आघाडी घेत 3 जागा पटकावल्या आहेत. तर शिवसेनेनं 2 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी, भाजपने प्रत्येक एक जागा जिंकली आहे. तर भाजप पुरस्कृत 1 उमेदवार विजयी झालाय.

आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. मुंबईचा निकाल सर्वात आधी आला. या निकालात शिवसेनेचे रामदास कदम 86 मतांनी आणि काँग्रेसचे भाई जगताप 64 मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना असल्यामुळे रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जात होता. निकालअंती यावर शिक्कामोर्तब झालं. या ठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते प्रसाद लाड अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. त्यांनी चांगली झुंज देत 55 मतं मिळवली पण 9 जागांनी त्यांचा पराभव झाला.

तर दुसरीकडे कोल्हापूरच्या आखाड्यात काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार महादेव महाडिक यांचा पराभव करत विजय मिळवला. सतेज पाटील यांच्या विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे कोल्हापूरची विधान परिषदेची निवडणूक दोन्ही उमेदवारांनी प्रतिष्ठेची केली होती. पण, सतेज पाटलांनी आपला गड राखत विजय संपादीत केला.

उत्तर महाराष्ट्रात धुळ्यात काँग्रेसचे उमेदवार अमरीश पटेल यांनी विजयी झाले. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे अरूण जगताप यांनी शिवसेनेचे उमेदवार शशिकांत गाडे यांचा पराभव करत विजय मिळवला. नागपूरमध्ये भाजपचे गिरीश व्यास विजयी झाले. तर सोलापुरात भाजप पुरस्कृत उमेदवार प्रशांत परिचारक यांनी विजय मिळवलाय. तर शिवसेनेनं ग्रामीण भागात आपलं वर्चस्व कायम राखलं. बुलडाण्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार गोपिकिशन बजोरिया यांनी राष्ट्रवादीचे रवी सपकाळ यांचा पराभव करत विजय मिळवला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close