मंगेश पाडगावकरांच्या जीवनप्रवास

December 30, 2015 4:00 PM0 commentsViews:

30 डिसेंबर : महाराष्ट्राचे लाडके कवी मंगेश पाडगावकर यांचं आज मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या त्यांच्या काव्यपंक्ती आजही अजरामर आहेत.

Padgaonkar jevan Pravas
प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं !

पाडगावकरांच्या याच कवितेनं अवघ्या महाराष्ट्राला प्रेम करायला शिकवलं. ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं…’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…’ पाडगावकरांच्या अशा एक ना अनेक कवितांनी महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं, किंबहुना कविता या साहित्य प्रकाराला लोकप्रिय करण्याचं श्रेय देखील पाडगावकरांनाच जातं.

बालकवितांपासून प्रेम कवितांपर्यंत त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली. उपहासात्मक कविता सादर करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. साधनाच्या सहसंपादकपदापासून त्यांनी करिअरची सुरूवात केली. पण तिथे ते फारसे रमले नाहीत, कारण त्यांच्यातला कवी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणूनच त्यांनी आकाशवाणीवर कविता वाचन सुरू केलं आणि अल्पावधीत पाडगावकर घराघरात पोहोचले. ‘शुक्रतारा मंदवारा’ या त्यांच्या गाण्याने तर महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं.

 रुईया कॉलेजमध्ये प्राध्यापकी करत असतानाच त्यांनी तरुणाईला प्रेमात पाडलं. पाडगावकरांची मिश्किली सर्वांनाच सुखावून जायची. ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘छोरी उत्सव’, ‘विदूषक’, ‘सलाम’ हे त्यांचे कविता संग्रह विशेष गाजले. मीराबाईंच्या गीतांचाही त्यांनी अनुवाद केला. पण नंतरच्या काळात प्रेमकविता आणि पाडगावकर हे समीकरणच बनून गेलं. पाडगावकर कुठेही जावोत, रसिकांची पहिली फर्माईश ही प्रेम कवितांचीच असायची. तर असा हा हसरा कवी आयुष्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्राला जगण्याचा निखळ आनंद देत राहिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close