नव्या वर्षांच्या ग्रॅण्ड सेलिब्रेशनसाठी बॉलिवूड गर्ल्सना वाढती मागणी

December 31, 2015 6:51 PM0 commentsViews:

31 डिसेंबर : बाय बाय 2015 आणि वेलकम 2016 असं म्हणायची, फायनली आता ती वेळ आली. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी रेडी आहेत. हे सेलिब्रेशन ग्रॅण्ड करायचं तर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स तर हवेतच, थर्टी फर्स्टची रात्र शानदार करण्यासाठी बॉलिवूड गर्ल्सही सज्ज. चला तर मग पाहूयात यावर्षी कोण कुठे परफॉर्म करतंय ते…

CELEB PERFORMANCE

वर्ष जसजसं सरायला लागतं तशी चर्चा सुरू होते ती न्यू इयर बॅशची. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी देश-परदेशात अनेक ठिकाणी भव्य पार्टीचं आयोजन होतं. या पाटर्‌यांमध्ये नाचण्यासाठी अभिनेत्रींनी परफॉर्म करावं यासाठी हवा तेवढा दौलतजादा करायची आयोजकांची तयारी असते. यावर्षीही काही सेलिब्रिटीज नव्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या पाटर्‌यांमध्ये परफॉर्म करणार आहेत.

यात पहिलं नाव आहे ते डेझी शहाचं, हेट स्टोरी थ्री या सिनेमातल्या हॉट सीन्समध्ये डेझी यंदा चांगलीच चर्चेत आहे. यंदाच्या नववर्षानिमित्त अंधेरीच्या क्लब महिंद्राने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये ती परफॉर्म करणार आहे. या परफॉर्मन्ससाठी आयोजकांनी तिला तगडी किंमत मोजली आहे. अशात डेझीही परफॉर्मन्समध्ये कोणतीही कसूर ठेवणार नाही हे निश्चित. प्रियांका चोप्राची चुलत बहीण मनारा चोप्राने यावर्षी झिद या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. सिनेमा चालला नाही पण तिचा बोल्ड अंदाज मात्र विशेष दाद मिळवून गेला. याच बळावर न्यू इयर पार्टीमध्ये डान्स करण्यासाठी तिला बोलावण्यात आलं. मनारा ही बंगळुरूमध्ये परफॉर्म करणार आहे.

बिग बॉसच्या घरातली एंट्री आणि त्यानंतर उपेन पटेलसोबतची लव्ह रिलेशनशिप यामुळे करिष्मा तन्ना यावर्षी चर्चेत राहिली. टीव्हीवर काम करूनही तिचा बिनधास्त स्वभाव सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरला. करिष्मालाही यंदा परफॉर्मन्स करण्यासाठी विचारणा करण्यात आलीय. करिष्मा पुण्यातील एका हॉटेलमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन पार्टीमध्ये परफॉर्म करणार आहे. ‘प्यार का पंचनामा-2′ हा सिनेमा यावर्षी यशस्वी ठरला. या सिनेमातली सोनल सेहगल ही प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. सोनलचा बोल्ड अंदाजामुळे ती आयोजकांच्या नजरेत आली. यंदा सोनल अहमदाबादमध्ये क्लब महिंद्रा रिसॉर्टमध्ये परफॉर्म करणार आहे.

आता या सगळ्या नवख्या मुलींना एवढी मागणी असताना विचार करा सनी लिओनला न्यू इयर बॅशमध्ये परफॉर्म करण्यासाठी किती मागणी असेल. सनी लिओन ही यावर्षी दिल्ली आणि त्यानंतर दुबईतल्या न्यू इयर पार्टीमध्ये परफॉर्म करणार आहे. परदेशात न्यू इयर सेलिब्रेशन तीन-चार दिवस होत असल्याने सनी आधी देशात आणि मग परदेशात परफॉर्म करणार आहे. बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये चित्रांगदा सिंगला न्यू इयर पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी ऑफर मिळालीय. दुबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार्‍या न्यू इयर पार्टीत ती परफॉर्म करणार आहे. आपल्या नव्या जुन्या आयटम साँग्जवर ती परफॉर्म करताना दिसेल, यासाठी आयोजकांनी तीला कोट्यवधी रुपये देऊ केलेत.

यंदा पहिल्यांदात अभिनेत्री रिचा चढ्ढाही न्यू इयर पार्टीत परफॉर्म करणार आहे. आपला इंटेन्स अवतार बाजूला ठेवत रिचा बोल्ड अवतारात पार्टी गोअर्सना खूश करणार आहे. रिचा यंदा दिल्लीमधील एका ग्रॅण्ड पार्टीत परफॉर्म करणार आहे.

न्यू इयर पार्टी ग्रॅण्ड करण्यासाठी आयोजकांकडून होणारी मागणी आणि एका रात्रीत वीसएक मिनिटं परफॉर्म करण्याच्या बदल्यात तिप्पट मिळणारी रक्कम यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटीज ही ऑफर हातची जाऊ देत नाहीत. कारण या ऑफरच्या बळावरच त्याचं न्यू इयर हॅपी ठरत असतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close