अदनान सामीला भारतीय नागरिकत्व

December 31, 2015 7:08 PM0 commentsViews:

adnan_sami1

31 डिसेंबर : पाकिस्तानी गायक अदनान सामीला अखेर भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आज याबाबत अधिकृत घोषणा केली. अदनान सामी यांच्या नागरिकत्वाची अंमलबजावणी नवीन वर्षात म्हणजेचं 1 जानेवारीपासून होणार आहे.

43 वर्षीय अदनान सामीने दोन वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व मिळावं म्हणून अर्ज केला होता. मात्र, तेव्हा त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर सामीने यावर्षी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संबंधित विभागाकडे अर्ज केला होता. या अर्जावर शिक्कामोर्तब करत सामीला आज भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे.

नागरिकत्व कायद्यातील कलम 6 अन्वये, विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रात योगदान देणार्‍या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, अदनान सामीची नागरिकत्वाची विनंती मान्य करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.

सामीचा जन्म पाकिस्तानातील लाहोर इथला असून तो सर्वप्रथम 13 मार्च 2001 रोजी भारतात आला होता. त्यावेळी त्याच्याकडे व्हिजिटर्स व्हिसा होता. नंतर सामी बॉलिवूडमध्ये स्थिरावला, लोकप्रिय झाला आणि इथेच रमला. त्यानंतर गेली 15 वर्षं व्हिसा रिन्यू करत तो भारतात राहतोय. 27 मे 2010 रोजी इश्यू केलेल्या त्याच्या पाकिस्तानी पासपोर्टची मुदत 26 मे 2015 रोजी संपली. पाकिस्तान सरकारने पासपोर्टला मुदतवाढ दिली नव्हती. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनात आपलं भारतातील वास्तव्य कायदेशीर करावं, अशी विनंती अदनाननं मे महिन्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली होती. ती त्यांनी मान्य केली होती. त्यानंतर, आता भारतीय नागरिकत्वाचा त्याचा अर्जही मंजूर करण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close