पठाणकोटमध्ये चकमक सुरूच, पाचवा दहशतवाद्याला कंठस्‍थान

January 3, 2016 7:54 PM0 commentsViews:

Pathankot 312

03 जानेवारी : पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 35 तासांहून अधिक काळ लोटला तरी, तेथील शोधमोहिम संपलेली नाही. कोम्बिंग ऑपरेशन सुरू असतानाच या परिसरात पुन्हा एकादा गोळीबार सुरू झाला असून, भारतीय सुरक्षा दलाचे जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत.

दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला त्यानंतर हॅण्ड ग्रेनेडच्या स्फोटांचाही आवाज ऐकू आला. हवाई दलाच्या तळात आणखी दोन अतिरेकी लपले बसल्याची शक्यता लष्कराने व्यक्त केली आहे. त्यातील एका दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात यश आलं असून, अजून एक दहशतवादी विमानतळातून फायरिंग करत आहे.

शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातून आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर हल्ला चढवला तेव्हापासून ही चकमक सुरू आहे. शनिवारी झालेल्या गोळीबारात 6 जवान शहीद झाले तर 4 दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं होतं. त्यामुळे चकमक संपली असं वाटले होतं. मात्र रविवारी सकाळी कोम्बिंग ऑपरेशन सुरू झाल्यानंतर आणखी दोन अतिरेकी लपून बसल्याचे समोर आलं. अद्याप अतिरेक्यांचा नेमका आकडा स्पष्ट झालेला नसून भारतीय सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे.

दरम्यान, सकाळी बॉम्ब निकामी करताना स्फोट झाल्याने लष्कराचे लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार हे शहीद झाले. एनएसजी आणि एनआयएची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. या हल्ल्यात भारताने आतापर्यंत आपले 7 जवान गमावले आहेत. यात संरक्षण दलाचे सहा, हवाई दल आणि गुरुडचे प्रत्येकी दोन जवान आहेत. मृत अतिरेक्यांकडे एके-47 रायफल, ग्रेनेड लाँचर आणि जीपीएस डिवाईस सापडले आहेत. तसंच इथल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षापथकांनी हॅलिकॉप्टरची मदत घेतली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close