राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’तील अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

January 3, 2016 4:25 PM0 commentsViews:

Khwada1

03 जानेवारी : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ या चित्रपटात ‘पांडा’ ही भूमिका साकारलेल्या 34 वर्षीय अभिनेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

प्रशांत इंगळे यांनी पांडा ही भूमिका साकारली होती. कर्जबाजारीपणा आणि सावकारी फासाला कंटाळून प्रशांत इंगळे यांनी किटकनाशक करणारे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे सुदैवाने ते बचावलेत.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात इंगळे राहतात. प्रशांत इंगळे यांनी घर बांधण्यासाठी एका खासगी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. मात्र, यंदा कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. याचाच फटका प्रशांत आणि त्याच्या कुटुंबाला देखील बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जामुळे ते दबावाखाली होते. त्यांच्यावर तीन लाखांचे कर्ज आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर चार दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती इंगळे यांच्या नातेवाईकांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातील कलाकारावर ही वेळ आल्यामुळे सर्वांना धक्का बसला असून यावरून अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close