र्‍हिदम हाऊसचे सूर मंदावाणार; सीडीजचं सर्वात मोठं दुकान फेब्रुवारीत होणार बंद

January 6, 2016 9:33 AM0 commentsViews:

अमेय चुंभळे, मुंबई

06 जानेवारी : तंज्ञत्रानाचे फायदे हजारो, पण त्यामुळे शहरात, आयुष्यात नकारात्मक बदल होणार असतील, तर मात्र त्रास होतो. मुंबईतलं सीडीज्‌चं सर्वात मोठं आणि जुनं दुकान र्‍हिदम हाऊस फेब्रुवारीत बंद होतंय. आज सगळेच गाणी डाऊनलोड करत असल्यामुळे हे दुकान चालवणं अशक्य झालंय. चला, र्‍हिदम हाऊसमध्ये एक शेवटचा फेरफटका मारून येऊ.

rhythm house

र्‍हिदम हाऊस… चित्रपटाची गाणी, DVDs, पॉप, हिपहॉप, शास्त्रीय संगीत…  इथे सगळं मिळतं. A to Zच्या क्रमानं सगळं कसं नीट रचून ठेवलेलं. विभागांची नावं स्पष्ट लिहिलेली. मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी कर्मचारी. बॅकग्राऊंडमध्ये लेटेस्ट गाणं, मग ते बेबी डॉल असू शकतं किंवा कट्यारमधलं सूर निरागस हो…

पण काही दिवसांतच हे सगळं नसणारे. या जागी नवीन काय उघडेल माहित नाही, पण र्‍हिदम हाऊस मात्र नसेल. 67 वर्षं वय असलेलं हे दुकान इतिहासजमा होईल. लोक आठवण काढतील, पण, “चल, र्‍हिदम हाऊसला जाऊ”, असा प्लॅन मात्र कुणी करणार नाही.. याचं कारण ऑडिओ सीडीचा अतिशय कमी असलेला खप.

हल्ली गाणी इंटरनेटवर फ्री मिळतात. ब्लूटूथवरूनही घेता येतात. मग एवढ्या लांब या, आणि गाण्यांसाठी पैसे द्या! कुणी संगितलंय? ही जनरल मानसिकता. फारच हौशी कुणी असेल तरच संगीतासाठी पैसे मोजणार.

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, नाना पाटेकर, ए. आर. रहमान आणि राज ठाकरे, या सर्वांमध्ये एक साम्य आहे. सगळेच र्‍हिदम हाऊसचे चाहते. पुस्तकाची दुकानं तरी अजून आहेत, पण संगीताची दुकानं आता उरली नाहीत. शहरात दुकानं हजार, पण काही दुकानांमध्ये शहराचा अंश असतो. मुंबईचा एक अंश आता लुप्त होणारे… नाहीसा होणारे… त्या अंशाची आठवण मात्र प्रत्येकाच्या मनात कायम राहील. म्हणूनच आजची पिढी पुढच्या येणार्‍या अनेक पिढीला हे नक्की सांगेल, “तुला माहितीय, इथे एकेकाळी र्‍हिदम हाऊस होत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close