जव्हार कुपोषणाच्या विळख्यात, गेल्या 9 महिन्यांत 37 बालकांचा मृत्यू

January 6, 2016 9:06 AM0 commentsViews:

विजय राऊत, जव्हार

06 जानेवारी : 23 वर्षं उलटूनही जव्हार परिसरातल्या आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न वर्षानुवर्षे जैसे थेच आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांच्या मतदारसंघातच गेल्या 9 महिन्यांत 37 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे.

malnutrition_0191d

1993 मध्ये जव्हारमध्ये कुपोषणाची गंभीर समस्या समोर आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी कुपोषणावर मात करण्यासाठी जव्हारमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणलं, अनेक मदत छावण्या सुरू केल्या. खेडोपाडी प्राथमिक आरोग्य केंद्रं उघडली. जेणेकरून कुपोषणाला आळा बसेल. मात्र 23 वर्षें उलटूनही कुपोषणाचा प्रश्न अजूनही जशाच तसा आहे.

जव्हार परिसरात गेल्या 9 महिन्यांच्या कालावधीत 1,433 बाळांंचा जन्म झाला. याविषयी आणखी माहिती मिळवली असता अतिशय विदारक चित्र समोर आलं. या नवजात बाळांपैकी 1233 बालकं सरासरीपेक्षा कमी वजनाची आहेत, ही माहिती जव्हार उपजिल्हा रुग्णालयानंच दिली आहे. एवढचं नाही तर, गेल्या 9 महिन्यांच्या कालावधीत जन्मलेल्या याच कुपोषित बालकांपैकी आतापर्यंत 37 बालकांचा मृत्यू झाला आहे.

सकस आहाराचा अभाव, बालविवाह, गरोदरपणात करावे लागणारे शारीरिक कष्ट, दोन मुलांमध्ये कमी अंतर अशी कुपोषणाची अनेक कारणं असल्याचं डॉकटरानी म्हटलं आहे.

कुपोषण दूर करण्यासाठी केंद्र तसंच राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातायत. या योजनांवर कोट्यवधी रूपये खर्च झाल्याचंही सांगितलं जातं. पण, त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतच नाहीत. अंडी, केळी, दूध यासारखा सकस आहार गरोदर मातांना गेल्या अनेक महिन्यांपासून मिळाला नसल्याचं आदिवासी नागरिक सांगतायत.

खुद्द आदिवासी विकास मंत्र्यांच्याच मतदार संघातच आदिवासी मुलांचा कुपोषणानं मृत्यू होत आहे. यासारखं दुदैर्व दुसरं काय?

सरकार बदललं, मंत्र्यांचे चेहरे बदलले पण आदिवासींच्या जीवनात मात्र काडीमात्र फरक पडलेला नाही. जव्हारमधला कुपोषणाचा विळखा कसा दूर होणार, याचं उत्तर सरकारनं द्यायला हवं…

कुपोषणाची कारणं

– सकस आहाराचा अभाव
– बालविवाह
– गरोदरपणात करावे लागणारे शारीरिक कष्ट
– दोन मुलांमध्ये कमी अंतर

जव्हार कुपोषणाच्या विळख्यात

1. जव्हार परिसरातल्या आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न वर्षानुवर्षे जैसे थे
2. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांच्या मतदारसंघातच कुपोषणामुळे बालमृत्यू
3. गेल्या 9 महिन्यांत 37 बालकांचा मृत्यू
4. 1,433 बालकांपैकी 1,233 मुलं कमी वजनाची
5. राज्य, केंद्र सरकारच्या सर्वच योजना अनेक महिन्यांपासून बंद
6. ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ अजून पोहोचलीच नाही

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close