स्वात खोर्‍यात शीख विद्यार्थ्याचे अपहरण

February 23, 2010 3:17 PM0 commentsViews: 5

23 फेब्रुवारीपाकिस्तानात तालिबान्यांनी 2 शीख व्यक्तींचे शिरकाण केल्याची घटना ताजी असतानाच, स्वात खोर्‍यात एका शीख विद्यार्थ्याचे तालिबान्यांनी अपहरण केले आहे. रॉबिन सिंग असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. माहिती तंत्रज्ञान शाखेचा हा विद्यार्थी असून, त्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी दीड कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे तालिबान्यांच्या ताब्यात असलेल्या व्यक्तींची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. यात्रेचा कालावधी कमी दरम्यान, शीखांच्या यात्रेसाठीचा कालावधी कमी करण्यात आला आहे. पाकिस्तानात पंजाब प्रांतातील पंजासाहिब गुरुद्वाराला भारतातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. ही यात्रा तीन दिवसांची असते. पण त्यासाठीचा कालावधी 1 दिवसावर आणण्यात आला आहे. पेशावरमध्ये झालेल्या शीखांच्या शिरकाणानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पाक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये निषेधपाकिस्तानातल्या शिखांच्या हत्येचा जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र निषेध करण्यात आला. जम्मू-पठाणकोट हायवेवरची वाहतूक निदर्शकांनी ठप्प केली होती. पाकिस्तानने याप्रकरणी तालिबान्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी निदर्शकांनी केली. दरम्यान, गुरुवारी दोन्ही देशांचे सचिव चर्चेसाठी भेटणार आहेत. त्यावेळी दहशतवादाच्या मुख्य मुद्द्यासोबतच शीख नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित केला जाणार आहे.

close