जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन

January 7, 2016 9:04 AM0 commentsViews:

muftims-kS1G--621x414@LiveMint

07 जानेवारी : जम्मू-काश्मिरचे आणि PDP चे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन झालं आहे. ते 79 वर्षांचे होते.

मुफ्ती सईद न्युमोनिया या आजाराने त्रस्त होते. प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे 24 डिसेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज सकाळी आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीत पीडीपीने भाजपच्या मदतीने जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं. त्यानंतर 1 मार्च रोजी त्यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. पण भाजपसोबत युती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या रूपानं देशाला पहिला मुस्लिम गृहमंत्री मिळाला होता. 1989 ते 90 च्या व्ही पी सिंग सरकारमध्ये ते केंद्रीय गृहमंत्री होते. मात्र 1989 साली मुफ्तींचं केंद्रीय गृहमंत्रीपद वेगळ्याच कारणाने गाजलं. त्यांची तिसरी कन्या रूबैया हीचं अतिरेक्यांनी अपहरण केलं होतं. त्याबदल्यात त्यांनी 5 अतिरेकी सोडण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली होती.

मुफ्ती मोहम्मद सईद यांचा जीवनप्रवास

– जन्म – 12 जानेवारी 1936, बिजबेहरा, अनंतनाग जिल्हा
– श्रीनगरमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण
– अलिगड मुस्लीम विद्यापीठातून कायद्याची पदवी
– गुलाम मोहम्मद सादिक यांच्या डेमोक्रॅटिक नॅशनल कॉन्फरन्सबरोबर राजकीय कारकिर्दीला सुरुवात
– 1962 – पहिल्यांदा बिजबेहरामधून आमदार
– गुलाम मोहम्मद सादिक यांच्याशी मतभेद झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश
– 1972 – इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री
– 1984 – नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका
– 1987 – काँग्रेस सोडून व्ही.पी. सिंह यांच्या जनमोर्चामध्ये सहभागी
– डिसेंबर 1989 ते नोव्हेंबर 1990 या काळात केंद्रीय गृहमंत्री
– भारताचे पहिले मुस्लीम गृहमंत्री
– गृहमंत्रीपदावर असताना त्यांची कन्या रुबिया सईद हिचं अतिरेक्यांकडून अपहरण
– रुबियाच्या सुटकेसाठी 5 अतिरेक्यांची सुटका
– जुलै 1999 – पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना
– नोव्हेंबर 2002 – नोव्हेंबर 2005 – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री
– राज्यात सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसबरोबर आघाडी
– फेब्रुवारी 2015 – जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या सहकार्यानं पीडीपी सत्तेत
– 1 मार्च 2015 – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून दुसर्‍यांदा शपथविधी

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close