पंढरपुरात ऑनर किलिंग, प्रेमविवाह केला म्हणून पत्नीच्या नातेवाईकांकडून पतीची हत्या

January 7, 2016 10:17 PM0 commentsViews:

pandharpur_kiling07 जानेवारी : कोल्हापूरमधील ऑनर किलिंगची धक्कादायक घटना ताजी असताना पंढरपूरमध्ये अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. यामध्ये प्रेमविवाह करणार्‍या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सोमनाथ बाळकृष्ण टाकणे असं या तरुणाचं नाव असून पत्नीच्या नातेवाईकांनी केलेल्या सश्त्र हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्या प्रकरणी मयत सोमनाथची पत्नी सौदामिनी यांनी आपल्या वडिलासह 12 नातेवाईकांवर पंढरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सोमनाथ त्याची पत्नी सौदामिनी आणि त्यांचे दीड वर्षाचे बाळ हर्षवर्धन हे बाळाला दवाखान्यातून उपचार करून मोटार सायकलवरून घराकडे निघालेले असताना या तिघांना भोसले कुटुंबातील तेराहून अधिक जणांनी अडवून सोमनाथच्या डोळ्यात चटणी टाकली. आणि सोबत आणलेल्या तलवार-सत्तूर सारख्या धारदार शस्त्रांनी सोमनाथाच्या डोक्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात सोमनाथचा जागीच मृत्यू झाला.

या प्रेमविवाहाची पार्श्वभूमी अशी की, सोमनाथ आणि सौदामिनी या दोघांनी अडीच वर्षापूर्वी पळून जावून लग्न केलं होतं. या लग्नाला सौदामिनी यांच्या कुटुंबाचा विरोध होता. सौदामिनीचे वडील नागेश भोसले हे पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष होते तर त्यांच्या पत्नी साधनाताई भोसले या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. अडीच वर्षापूर्वी प्रेमविवाह झाल्यानंतर दोनवर्षे हे दापत्य उस्मानाबाद येथे वास्तव्य करीत होते. सहा महिन्यापूर्वी हे दाम्पत्य पंढरपूरमध्ये वास्तव्याला आले होते. दरम्यान भोसले कुटुंबाच्या भीती पोटी सोमनाथने काही दिवस पोलीस संरक्षण घेतलेले होते. या हल्ल्यात त्याची पत्नी सौदामिनी आणि त्याचे दीड वर्षाचे बाळ सुखरूप बचावले आहेत. या हल्ल्या प्रकरणी मयत सोमनाथची पत्नी सौदामिनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंढरपूर शहर पोलिसांनी 13 जनावर गुन्हा दाखल केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close