मुंबईत सेल्फीच्या नादात तरुणीचा मृत्यू

January 9, 2016 8:44 PM0 commentsViews:

प्रणाली कापसे, मुंबई

09 जानेवारी : सेल्फी काढणं तुमच्या जिवावरही बेतू शकतं. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर आज एकाच दिवशी, एकाच वेळी दोन ठिकाणी सेल्फीच्या नादात समुद्रात 4 जणं बुडाले. त्यापैकी एक जण अजूनही बेपत्ता आहे. इतर तिघांना वाचवण्यात यश आलं आहे.

Selfei231
अथांग समुद्राच्या किनार्‍यावर स्वत:चा फोटो काढण्याचा मोह कुणाला होणार नाही? पण हा मोह मुंबईच्या 4 जणांना चांगलाच महागात पडला आहे. बँडस्टॅन्डवर गेलेल्या तीनही तरुणी बर्‍याच आत जऊन फोटो काढण्यात दंग होत्या. दरम्यानच्या काळात भरतीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागली. मात्र एका बेसावध क्षणी सेल्फी काढत असताना अचानक या मुलींचा पाय घसरला आणि त्या थेट समुद्रात बुडू लागल्या. तिन्ही जणी पाण्यात बुडत असताना रमेश नावाच्या एका तरूणानं जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी घेऊन एका मुलींचा जीव वाचवला, पण स्वतः मात्र वाहून गेला.

हा प्रकार घडत होता, अगदी त्याच वेळी कार्टर रोडलासुद्धा असंच एक जोडपं सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात वाहून जाऊ लागलं होतं, पण स्थानिक कोळीबांधव आणि फायर ब्रिगेडच्या मदतीनं त्यांना वाचवण्यात यश आलं.

फोटो काढायला कुणाचाही विरोध नाही, पण ज्या देहाचा तुम्ही फोटो काढत आहेत, तो देह तरी सुरक्षित आहे का? याचा तरी विचार करावा. तुम्ही काढलेला सेल्फी तुमचा अखेरचा फोटो ठरू नये, याची काळजी तुम्हीच घ्यायला हवी.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close