जीव अडकला मोत्यात, गडचिरोलीत तरुणाने विकसित केली मोत्यांची शेती !

January 11, 2016 2:43 PM0 commentsViews:

11 जानेवारी : राजे-महाराजांची शान असलेला मोती सगळ्यांना हवाहवास वाटतो. समुद्राच्या तळाला शिंपल्यात मिळणारे मोती आता
गडचिरोली सारख्या दुर्गम भागात पिकवण्याची किमया संजय गंडाटे या तरुणाने करुन दाखवली. विशेष म्हणजे संजय याने गोड पाण्यात लाखमोलाच्या मोत्यांचं पिक घेतलंय. या मोत्यांचा भाव प्रति नग 500 ते 700 रुपये असून वर्षाकाठी ते 11 ते 12 लाखांचं उत्पन्न घेतात.

parls_farmingसततच्या नापिकीमुळे शेती पिकवणं कठीण होऊन बसलं असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात संजय गंडाटे या तरूण
शेतकर्‍यानं गोड्या पाण्यात मोत्यांची शेती करायला सुरुवात केली आहे. ज्या शेतात पूर्वी काही क्विंटल धान्य पिकत होतं, तिथं आता मोती पिकताहेत. संजय या शेतीमधून दरवर्षी लाखो रुपये कमावत आहे. त्यामुळे इतर शेतकर्‍यांसमोर आशादायक चित्र निर्माण झालंय.

संजय गंडाटे उच्चशिक्षित आहे. त्यांनी नोकरी सोडून शेती करायचा निर्णय घेतला. मात्र, इतरांप्रमाणे शेती न करता वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. त्यानंतर कृषी महाविद्यालयाची मदत घेऊन पाण्यात मोती तयार करण्याचं तंत्र विकसित केलं. 10 बाय 10च्या तळ्यात ही मोत्यांची शेती केली जाते. त्यातून संजय गंडाटे यांना वर्षाला 11 ते 12 लाखांचं उत्पन्न मिळतंय.

संजयला हे मोतीचे तीन हजार नग पिकवण्यासाठी त्याला अठरा महिने लागतात. 2012 पासून गंडाटे यांनी 10 बाय 10 व 8 ते 10 फुट खोल खड्डा शेतात खोदला. वैनगंगा नदीतून मजुरांकरवी शिंपले काढून मोतीची शेती करण्यास सुरूवात केली. सध्या गंडाटे यांनी दुसर्‍यांच्या शेतातील शेततळ्यात जवळपास चार हजार शिंपले टाकलेली आहेत. अठरा महिन्यांत शिंपल्यांमध्ये मोती पूर्णत: तयार होणार आहे. मोती तयार झाल्यानंतर बाजार भावानुसार प्रति नग 500 ते 700 रूपयांत विकला जातो. गंडाटे यांनी पारंपरिक शेतीबरोबरच शिंपल्यांची उद्योगी शेती करण्याचा संकल्प केल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे.

कसे तयार होतात मोती ?

- सर्वात आधी शिंपल्यांमध्ये साच्यात मोत्याचं बीज टाकलं जातं
– जाळ्यांच्या मदतीनं हे शिंपले पाण्यात सोडले जातात
– 5-6 महिन्यांनंतर या शिंपल्यांमध्ये मोती तयार होतो
– मोत्यांसाठी शिंपलेही आवश्यक असतात
– शिंपल्यांची बीजं नदीतूनच मिळतात, त्यामुळे उत्पादन खर्च कमी
– संजय गटाडे यांनी डिझायनर मोत्यांचं तंत्रही शोधलं
– मोती तयार करण्यासाठी निरनिराळ्या आकाराचे साचे
– बाजारात एका मोत्याला 500 रु. भाव

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close