हाणामारी करणार्‍यांंना कोर्टाची अनोखी शिक्षा

January 11, 2016 8:50 PM0 commentsViews:

Thane12

11 जानेवारी : कोर्टा बाहेर तडजोड करून आरोपी सहीसलामत सुटतात या प्रकाराला आळा बसावा यासाठी मुंबई हायकोर्टाने अनोखी शिक्षा सुनावली आहे. ठाण्यात दसरा मिरवणुकीदरम्यान एका महिलेचा चार तरूणांनी विनयभंग तसंच हाणामारीही केली होती. हाणामारी करणार्‍या 4 तरुणांना 6 महिन्यांपर्यंत दर रविवारी 8 तास रस्ते झाडण्याची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.

22 ऑक्टोबर 2015 रोजी दसर्या दिवशी ठाण्यातील पाचपाखाडी भागातून देवीची मिरवणूक जात असताना स्थानिक चार तरुणांनी दारू पिऊन धिंगाणा सुरु केला. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी मिरवणुकीतच एका महिलेची छेडछाड करून विनयभंग केला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चारही तरुणांना तेथील एका युवकाने थांबविण्याचा प्रयत्न करताच अनिकेत जाधव, सुहास ठाकूर, मिलिंद मोरे आणि अमित अडखळे या चौघांनी त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी या चौघा आरोपींना अटक केली खरी परंतु चौघांनी कोर्टाबाहेरच फिर्यादिंबरोबर समझौता करून आरोप मागे घ्यायला लावले. परंतु या गोष्टीने कोर्टाचे समाधान झाले नाही व हा चुकीचा पायंडा पडत असल्याचे कडक ताशेरे कोर्टाने ओढले. या चौघांना स्वतःच्या कृत्याची लाज वाटावी आणि पश्चात्ताप व्हावा यासाठी सदर आरोपींनी पुढचे 6 महिने दर रविवारी 8 तास स्वतःच्याच परिसरात झाडू मारण्याची सजा सुनावली.

स्थानिक नौपाडा पोलिसांनी यावर लक्ष देऊन याबाबतचा अहवाल कोर्टात सदर करावा असं देखील कोर्टाने सुनावले. त्याव्यतिरिक्त चौघांकडून 5 हजार दंड आकारून तो टाटा कर्करोग रुग्णालयात दान करण्याचे आदेश दिले. अशा प्रकारे एक नवीनच पायंडा या शिक्षेने समाजात घालून दिला असून कायद्यातून अशा पळवाटा शोधणार्यांना यामुळे चांगलीच चपराक बसली आहे यात शंकाच नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close