‘ते’ शब्द मागे घेतो, श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली दिलगिरी

January 12, 2016 9:25 PM0 commentsViews:

shripal Sabnavis 43323

12 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरीत उल्लेख करून त्यांच्यावर टीका करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधानांना तशा प्रकारचं पत्रही लिहिल्याचं सांगितलं. त्यात त्यांनी मोदींच्या राष्ट्रभक्तीचा गौरव केला आहे. मोदींना लिहिलेलं पत्र त्यांनी पत्रकार परिषद वाचून दाखवलं.

89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडत, त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली होती. साहित्य संमेलन अगदी तोंडावर आलं असताना हा वाद सुरू झाला. अखेर सबनीस यांनी दिलगिरी व्यक्त करत संमेलन सुरळीत पार पाडावं अशी आशा व्यक्त केली आहे.

श्रीपाल सबनीस यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र वाचून दाखवलं. मोदींच्या राष्ट्रप्रेमाबद्दल आपल्याला आदर असून, त्यांच्या राष्ट्रनीतीचा मी पुरस्कर्ता आहे, अशी स्तुती त्यांनी केली. इतकंच नाही तर मोदींनी मोठ्या हिंमतीने पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली, हे कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले.

तसंच, भाषणात मोदींचा एकेरी उल्लेख नको करायला होता, असं त्यांनी मान्य केलं. एकेरी उल्लेख केल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेतला. जवळच्या काही व्यक्तींनीही नाराजी व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. पण, आपण केलेल्या वक्तव्यांचा विपर्यास केला गेलाचा दावाही त्यांनी केला.

झालं गेलं गंगेला मिळालं, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी आपण दिलगिरी व्यक्त केल्याचंही सबनीस म्हणाले. मात्र, आयोजकांकडून सबनीसांवर दबाव टाकण्यात आला होता. संमेलन सुरळीत होण्यासाठी सबनीसांनी एक पाऊल मागे यावं असं आयोजकांनी सुचवलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सबनीस यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केल्याने येत्या शुक्रवारपासून पिंपरीमध्ये होत असलेले साहित्य संमेलन निर्विघ्न पार पडेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close