महागाई कमी झाल्याचा दावा

February 25, 2010 3:49 PM0 commentsViews: 8

25 फेब्रुवारीमहागाईविषयी भविष्यवाणी करणारे आणि त्याबाबत मीडियासमोर उलट-सुलट विधाने करणारे कृषीमंत्री शरद पवार यांनी आज संसदेत देशातील महागाई कमी झाल्याचा दावा केला. आणि त्यासाठीही त्यांनी पेपरमधील बातम्यांचा दाखला दिला! यासोबतच सरकारच्या उपाययोजनांमुळेच भाव कमी होत असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. महागाई कमी झाली आहे… लोकसभेत सुरू असलेल्या महागाईवरील चर्चेला पवार उत्तर देत होते. विरोधकांनी मान्य केले नाही तरी मागील 3 महिन्यांच्या तुलनेत सध्याचे दर कमी आहेत. साखरेचे भावही कमी होत आहेत, असे सांगत जीवनावश्यक वस्तू विक्री कायद्यातच सुधारणा करण्याची आवश्यकता पवारांनी व्यक्त केली. समिती नियुक्तमहागाई कमी करण्यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील काही नेत्यांची समिती नियुक्त केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच महागाई कमी करण्यासाठी आलेल्या सर्व सूचनांचा स्वीकार केल्याचेही ते म्हणाले.शेतकर्‍यांना योग्य भाव महागाई वाढली असली तरी शेतकर्‍यांना योग्य भाव देऊन त्यांचा फायदा केला, हे सांगण्यासही पवार विसरले नाहीत. विदर्भातील शेतकर्‍यांच्या कापसाला अडीच ते तीन हजार रुपये भाव दिला. गव्हाच्या आधारभूत किंमतीत 72 टक्क्यांची वाढ केली. भाताची आधारभूत किंमत 560 रुपयांवरून 1 हजार रुपयांवर नेली. पंजाब, हरियाणा आणि बिहारमधले भात पिक वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्याची भरपाई देण्यात येत आहे. देशात शेती करणार्‍या लोकांची संख्या 7 कोटींच्या आसपास आहे. शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन यूपीए सरकारने दिले होते. त्या आश्वासनाची आम्ही पूर्ती करत आहोत, असेही पवारांनी यानिमित्ताने नमूद केले. आयात-निर्यात धोरणात बदल महागाई कमी करण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांबद्दल सांगताना पवार म्हणाले, एएआय, बीपीएल, आयपीएलधारकांसाठी सरकार 72 हजार कोटींचा बोजा पेलत आहे. 2002 पासून आजपर्यंत बीपीएल, आयपीएलकार्ड धारकांसाठी गव्हाचे भाव स्थिर ठेवण्यात आले आहेत. मागणी पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी आयात निर्यातीच्या धोरणात काही बदल करण्यात आलेत. साखर, बटाटा स्वस्तसाखरेचे भाव कमी होत आहेत. आपण साखरेचा साठा करु शकत नाही. यावर्षी साखरेचे उत्पादन कमी झाल्याने साखर आयातीची परवानगी दिली आहे. बटाटा तर कमालीचा स्वस्त झाला आहे. 3 आठवड्यापूर्वी 16 रुपये असलेला भाव आज 4 रुपयांवर आला आहे, असे पवारांनी सांगितले. पण पवारांच्या या निवेदनावर विरोधक नाराज झाले. त्यांनी सभागृहात गोंधळ सुरू केला. आणि नंतर सभात्याग केला. पवारांनी जरी संसदेत स्वस्ताईचा दावा केला असला तरी बाजारातले सध्याचे भाव काय आहेत, ते पाहूया- साखर- 38 रु. तूर डाळ- 80 रु.मूग डाळ- 96 रु.चणा डाळ- 40 ते 48 रु.उडीद डाळ- 96 रु.कांदे- 18 रु.बटाटा- 16 रु.फ्लॉवर- 32 रु.कोबी- 20 रु.फरसबी- 40 रु.मटार- 40 रु.भेंडी- 40 रु.

close