शिवसेनेत जाणार नाही, छगन भुजबळांनी केलं स्पष्ट

January 13, 2016 5:58 PM0 commentsViews:

13 जानेवारी : छगन भुजबळ शिवसेनेत परतणार या बातमीने राजकीय वातावरण चांगलेच तापले. पण चर्चेला खुद्द छगन भुजबळ यांनी पूर्णविराम दिलाय. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यासोबत चर्चा झालेली नसून आपण शिवसेनेत जाणार नाही असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. तसंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडल्याबद्दल त्यांचे आभारही भुजबळांनी मानले.

Bhujbal2311

महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळांची बाजू घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. भुजबळ आणि अधिकार्‍यांवर झालेले आरोप घिसाडघाईने झाले आहे. अँटी करप्शन विभागाने कोणताही नीट अभ्यास न करता गुन्हे दाखल केले असं निदर्शनास आलं. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये असा सल्ला राऊत यांनी दिला होता. संजय राऊत यांच्या पत्रामुळे भुजबळांची घरवापसी होते की काय ?, या चर्चेला उधाण आलं. भुजबळांची चौकशी सुरू आहे पण राष्ट्रवादी खंबीरपणे पाठीशी उभी नाही अशी भावना भुजबळांची आहे. नाशिकमध्येही भुजबळांवर होत असलेल्या कारवाईमुळे तीव्र नाराजी आहे. त्यामुळे भुजबळ सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण, खुद्द भुजबळ यांनी या चर्चेला पूर्णविराम दिलाय. आपण शिवसेनेत जाणार नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलं. शिवसेनेकडून असा कोणताही प्रस्ताव नाही. सेनेच्या कोणत्याही नेत्यांसोबत चर्चा झाले नाही असंही भुजबळ म्हणाले. परंतु, नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी सर्व काही सांगून जात आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close