पैशांनी भरलेल्या गोण्या जळून खाक, भिकारी पुन्हा ‘रस्त्यावर’

January 14, 2016 10:34 AM0 commentsViews:

kalyan_bhikariकल्याण -13 जानेवारी : दैव देतं, अन कर्म नेतं…अशीच गत कल्याणमध्ये एका भिकार्‍यासोबत झाली. भिक मागून जमवलेले पैसे जळून खाक झाल्यामुळे या भिकार्‍याला पुन्हा रस्त्यावर यावं लागलं. धक्कादायक म्हणजे या भिकार्‍याकडे एकाच गोणीतले पैसे जळाले नाही तर 4 ते 5 गोण्यातील पैसे जळून खाक झाले आहे.

कल्याणच्या मोहने परिसरात मोहम्मद रेहमान आणि त्यांचं कुटुंब राहतं. मंगळवारी मध्यरात्री झोपडीत मेणबत्ती पडल्यामुळे लागलेल्या आगीत पैशांनी भरलेल्या गोणी जळल्याचं समोर आलं आणि हा विषय चर्चेचा बनला. रेहमान भीक मागतो, गेले कित्येक वर्ष भीक मागून जमा झालेले पैसे तो गोण्यांमध्ये भरून ठेवायचा. बरं थोडे थोडके नाहीतर तब्बल 4 ते 5 गोण्यांमध्ये हे पैसे भरून ठेवले होते अशी माहिती त्याची पत्नी फातिमा हिने ही माहिती दिली.

रस्त्यालगत असलेल्या नाल्याजवळ अवघ्या 10 बाय 10 च्या झोपडीत हे भिकारी दाम्पत्य राहतं होतं. भिक मागून जमावलेले पैसे याच झोपडीत लपवून ठेवले होते. कुणाच्या हाती पैसे लागू नये म्हणून पाण्याच्या ड्रम असो किंवा छोट्या बरण्यामध्ये हे पैसे लपवून ठेवले होते. मंगळवारी रात्री मेणबत्ती लावून दोघेजण झोपी गेले. परंतु, मध्यरात्री मेणबत्ती उलटली आणि पैसे लपवून ठेवलेल्या बोचक्यावर पडली. काही क्षणात लाखो रुपये जळून बेचीराख झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आणि त्यांनंतर अर्धवट जळालेल्या नोटांची रास पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आग विझवल्यानंतर या कुटुंबातील सर्व सदस्य याठिकाणी आगीत वाचलेले पैसे शोधून गोळा करण्याचे काम करीत होते. पांढर्‍या रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोणीत 10 आणि 20 रुपयांच्या नोटा होत्या. त्यातील काही नोटा अर्धवट जळालेल्या तर काही सुस्थितीत होत्या.

दरम्यान या नोटा दाखवत असताना अचानक या गोणीतून एक प्लॅस्टिकच्या पिशवीतील नोटांचे बंडल बाहेर आले. मात्र या महिलेने ते ताबडतोब पिशवीत टाकून ते लपवलं. दुसर्‍या दिवशी सकाळी 2 मोठे ड्रम भरून पैसे याठिकाणाहुन दुसरीकडे हलविण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं. तर यासंदर्भात खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र अशा प्रकारे कोणतेही पैशाच्या गोणी आढळल्या नसल्याचे अजब उत्तर दिलं. त्यामुळे एवढे पैसे आणि तेही भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या कुटुंबाकडे आले कुठून हा मोठा प्रश्न यातून उपस्थित होत आहे. या प्रकराची उकल करणे सोडून पोलीस हा प्रकार पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close