महागाई वाढवणारे आणि दिलासा देणारे…

February 26, 2010 10:27 AM0 commentsViews: 50

26 फेब्रुवारीअर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेले बजेट हे सर्वसामान्यांना दिलासा देणारे आहे, असे सत्ताधारी खासदारांना वाटते. तर हे महागाई वाढवणारे बजेट असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पेट्रोल, डिझेलची वाढ जाहीर होताच सभात्याग करणार्‍या विरोधी पक्षांनी आता महागाईविरोधात एकत्र येण्याचे ठरवले आहे.हे नेते काय म्हणतायत, त्यावर एक नजर- सुषमा स्वराज- महागाईवर संसदेत कालच जोरदार चर्चा झाली. या चर्चेमुळे तरी महागाई रोखण्यासाठी सरकार बजेटमध्ये काही तरी पावले उचलेल, असे वाटले होते. पण ही सगळी चर्चा त्यांच्या डोक्यावरूनच गेलेली दिसते. डिझेल आणि पेट्रोल हे सर्वसामान्यांच्या रोजच्या गरजेचे आहे. हे बजेट जनताविरोधी, शेतकरी विरोधी आणि महागाई वाढवणारे आहे. लालूप्रसाद यादव- सरकारने लादलेल्या महागाईविरोधी आंदोलनासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील. महागाईविरोधात आम्ही सरकारला एकजूट दाखवून देऊ.शरद यादव- शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य जनतेला महागाईच्या आगीत जाळणारे हे बजेट आहे. म्हणूनच याला विरोध करण्यासाठी आम्ही सभात्याग केला. शिवाजीराव आढळरावपाटील- पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीमुळे अर्थव्यवस्था सरकारच्या ताब्यात राहणार नाही. महागाईचा दर वाढतच राहील. एक्साईज ड्युटी वाढवल्याने कम्प्युटर आणि इतर वस्तू 10 टक्क्यांनी महागतील. त्यामुळे आम्ही या महागाईला लोकसभेत कडाडून विरोध करणार.विलासराव देशमुख- समाजातील सर्व वर्गांना दिलासा देणारे हे संतुलित बजेट आहे. यूपीएच्या धोरणानुसार 'आम आदमी'पर्यंत पोहोचणारे हे बजेट आहे. या बजेटमध्ये शेतकर्‍यांसाठी 5 टक्के व्याजाने कर्जाची घोषणा झाली आहे. मागील वर्षी हाच व्याजदर 6 टक्के होता. महिलांसाठीची तरतूद 50 टक्क्यांनी वाढवली आहे. मागासवर्गीयांसाठीचे बजेट 80 टक्क्यांनी वाढले आहे. विरोधकांनी किमान बजेट पूर्णपणे ऐकण्याचे सौजन्य दाखवायला हवे होते. संजय निरुपम- हे ग्रामीण भागाला आणि शेतकर्‍यांना न्याय देणारे बजेट आहे. सिगारेट, गाड्यांची भाववाढ जनविरोधी असू शकत नाही. जगात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचे वास्तव स्वीकारलेच पाहिजे. महिंद्रा ऍन्ड महिंद्राचे कार्यकारी संचालक अरूण नंदा- डिझेल, पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाई वाढते. कारण या वाढीचा थेट परिणाम महागाईवर होतो. अगदी शेतमाल ने-आण करण्यासाठीही डिझेल, पेट्रोलचीच गरज लागते. त्यामुळे महागाई वाढेल यात शंका नाही. सुनील मंत्री, बांधकाम व्यावसायिक- बांधकाम क्षेत्राला या बजेटमधून दिलासा मिळालेला नाही. पेट्रोल, डिझेल, सिमेंटच्या दरवाढीमुळे बांधकामखर्च वाढेल. साहजिकच घरांच्या किंमती वाढतील. या बजेटमध्ये 10 लाखांपर्यंतच्या घरांना सबसिडी देऊ केली आहे. पण मुंबईसारख्या शहरात त्याचा फायदा होणार नाही. कारण मुंबईत 10 लाखांत घरच मिळत नाही.

close