मराठीचे राजकारण…

February 26, 2010 1:47 PM0 commentsViews: 4

विनोद तळेकर, मुंबईमराठीचा मुद्दा हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्यापासून राजकारणातही मराठी भाषा दिनाचे महत्व वाढले आहे. हा दिवस मनसे मोठ्या प्रमाणावर साजरा करणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच मिळाले. तर शिवसेनेनेही या मराठी भाषा दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल आहे. त्यामुळे मराठी भाषा दिन आता राजकीय अजेंड्यावर महत्वाचा ठरला आहे.मराठी राजकीय व्यासपीठावर 27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून तो साजरा केला जातो. राजकीय व्यासपीठावर त्याचे तितकेसे महत्व नव्हते. पण मराठी अस्मितेच्या मुद्यावरून राजकारण तापू लागल्याने महाराष्ट्र दिन, मराठी भाषा दिन यांसारख्या दिवसांना राजकीय महत्व आले आहे. मनसेने तर मराठी भाषा दिनासह मराठी भाषा अभिमान सप्ताहच साजरा करण्याची घोषणा केली. त्यासाठी मनसेनं एक मार्गदर्शिकाही तयार केली आहे.शिवसेना तोडीस तोड शिवसेनाही हा दिवस साजरा करते. मात्र साधेपणाने. या वर्षी मात्र मनसेच्या अभिमान सप्ताहाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेन हा दिवस जल्लोषात साजरा करण्याचे ठरवले आहे. 27 फेब्रुवारीला बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मराठी भाषेतील काही ऐतिहासिक अग्रलेख आणि व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जोडीला पारंपारिक मराठी लोकगीतांच्या एका विशेष कार्यक्रमातून वातावरण निर्मिती केली जाणार आहे. 25 फेब्रुवारीला शिवसेनेने आयोजित केलेले शिवराय संचलन पाहता आपणही मराठीसाठी मागे नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.मराठी भाषा दिनाचे राजकीय श्रेय मिळवण्याची अशी धडपड सध्या या दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे. पण यानिमित्ताने माय मराठीचा उदो उदो होतो आहे, हेही नसे थोडके!

close