मुंबईतल्या मोकळया जागा विकू देणार नाही – राज ठाकरे

January 15, 2016 4:55 PM0 commentsViews:

raj thackaey pc

मुंबई – 15 जानेवारी :  मुंबईतील उद्यगने आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या मोकळया जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा महापालिकेचा डाव आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मोकळय़ा बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. आम्हाला काय म्हणायचं आहे, हे राज्य सरकारला समजलंच असेल. त्यामुळे त्यांनी यावर योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात जे घडेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा सूचक इशाराही ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.

मुंबईतील मोकळया जागांवर बिल्डारांचा डोळा असून, या जागा विकत घेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. सत्ताधार्‍यांचाही या बिल्डारांना पाठिंबा आहे. उद्याने आणि, खेळांच्या मैदानासाठी आरक्षित असलेली मुंबईतील 1200 एकर मोकळी जागा खासगी संस्था आणि बिल्डारांना देण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला आहे. या माध्यमातून पैसे कमावण्याचा डाव आहे. या प्रस्तावाला मनसेने तीव्र विरोध केला आहे. यापुढेही तो आम्ही करणारच. कोणत्याही परिस्थितीत या जागा बिल्डारांच्या घशात घालू देणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला.

मोकळया जागा वाचल्याच पाहिजेत. याविषयी नागरिकांची मते जाणून घेणार आहे. त्यासाठी आजपासून आंदोलन उभारण्यात येणार आहे. तसेच मुंबईभर स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येणार असून, कोणताही राजकीय रंग न देता मुंबईतील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. या मोहिमेचा लेखाजोखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाईल, अशी माहिती ठाकरे यांनी या वेळी दिली. राज्यसरकारने यावर त्वरीत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. भावी पिढीसाठी मोकळया जागा वाचाव्यात यासाठी नागरिकांनीही सतर्क रहावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close