आमचा कित्ता गिरवू नका, पवारांनी टोचले साहित्यिकांचे कान

January 16, 2016 3:53 PM0 commentsViews:

sharad_pawar_samelanपिंपरी चिंचवड – 16 जानेवारी : संमेलनाध्यक्ष निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया घेतली जाते आता मतं कशी मिळवली जाते हे आम्हाला चांगलं माहित आहे. त्यामुळे साहित्यकांनी आमचा कित्ता गिरवू नये असा सल्लावजा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साहित्यिकांना लगावला. तसंच यापुढे साहित्य संमेलनाध्यक्ष निवडण्यासाठी माजी संमेलनाध्यक्षांची समिती नेमावी आणि त्यांनीच संमलेनाध्यक्षाचं नाव सुचवावं असा सल्लाही पवारांनी दिला. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही साहित्यकांनी आपले वाद साहित्यापुरतेच ठेवावे, राजकारणात पडू नये असा टोला लगावला. तर सबनीस यांनी आपल्या संमेलनाध्यक्षाच्या भाषणात सपेशल लोटांगण घेत माझी भूमिका समजून घ्या असा माफीनामा पुन्हा एकदा मांडला.

89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकेरी भाषेत केलेली टीका आणि सनातनने दिलेल्या धमकीमुळे संमेलनावर वादाचे ढग जमा झाले होते. संमेलनाच्या दोन दिवसाआधी सबनीसांनी जाहीर माफीनामा सादर करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आज (शनिवारी) उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड
मध्ये लाखो सारस्वतांच्या उपस्थिती भव्य दिव्य असा साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन मोठ्या थाटात पार पडलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार यांनी आपल्या भाषणात साहित्यिकांचे चांगलेच कान टोचले. उद्योगनगरीत संमेलन भरलंय याचा मनापासून आनंद असून आपल्या इथून चार वेळा खासदारपदी निवडणूक आलोय. सलग चौथ्यांदा संमेलनाला उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं याबद्दल मी साहित्यिकांचा आभारी आहे. अलीकडे टीव्हीवर श्रीपाल सबनीस यांचा वाद पाहिला. मुळात श्रीपास सबनीस यांच्यासारखा अभ्यासू साहित्यिक संमेलनाच्या अध्यक्षपदी आहे ही चांगली बाब आहे. पण, संमेलनाध्यक्ष निवडण्यासाठी साहित्यिकांनी आता विचार करण्याची गरज आहे. कारण, संमेलनाध्यक्ष निवडीसाठी मतप्रक्रिया पार पडते. पण, मतं कशी मिळवली जाते हे आम्हाला चांगला माहित आहे. त्यामुळे साहित्यकांनी आमचा कित्ता गिरवू नये असा टोला शरद पवारांनी लगावला. तसंच यापुढे संमेलनअध्यक्ष निवडण्यासाठी माजी पाच संमेलनाध्यक्षांची समिती स्थापन करावी आणि त्यांनीच संमेलनाध्यक्षाचं नाव सुचवावं. जेणे करून त्यांच्या अनुभवातून योग्य असाच संमेलनाध्यक्ष आपल्याला लाभेल असा सल्लाच पवारांनी दिला. व्यक्त होणं आणि अभिव्यक्ती हे वेगळं आहे असं सांगत पवारांनी सबनीसांना चांगलंच फटकारलं. पवारांनी आपल्या भाषणात तरुण साहित्यिक, दलित साहित्याचा आवर्जून उल्लेख केला. नव्या आणि तरूण साहित्यिकांची निर्मिती होतं आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यांचं स्वागत आणि कौतुक झालाचं पाहिजे असंही पवार म्हणाले. शरद पवार यांनी संमेलनाच्या निमित्ताने आपल्या स्टाईलने सबनीसांसह समस्त साहित्यिकांचे चांगलेच कान टोचले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close