संमेलनाध्यक्ष पडले एकटे, मुख्यमंत्र्यांनी केला हिशेब चुकता ?

January 16, 2016 6:28 PM0 commentsViews:

cm_sabanis_samelanपिंपरी-चिंचवड 16 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करत टीका करुन भाजप कार्यकर्त्यांचा रोष ओढावून घेणारे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची संमेलनात चांगलीच कोंडी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उशिरा येणं, भाषणांमधून काही माणसं नकारात्मक बोलून प्रसिद्धी मिळवतात. अशा सूचक कोपरखळ्या मारणं, आणि संमेलनाध्यक्षांचं भाषणाला सुरुवात होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी एक्झीट घेतली. आणि खुद्द सबनीसांना त्यांच्या भाषणातूनच मुख्यमंत्री माऊंट अबूला गेल्याची घोषणा करावी लागली. त्यामुळे एकाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी सबनीसांना चपराक लगावल्याची चर्चा साहित्य संमेलनात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी औचित्यभंग केला का, अशीही चर्चा सुरू आहे.

‘तो मोदी पाकिस्तानला गेला, मोदी हा माझा पंतप्रधानच नाही’ अशा एकेरी भाषेत उल्लेख करणारे साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. अपेक्षेप्रमाणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सबनीसांना चांगलंच फैलावर घेतलं. एवढंच नाहीतर मध्यतंरी सनातनने सबनीसांना मॉर्निंग वॉकला जात चला अशी धमकी देऊन आणखी भरात भर पडली. या वादावर पडदा टाकण्यासाठी सबनीसांनी माफीनामाही सादर केला. पण आज संमेलनाच्या दिवशीही याचे पडसाद उमटून आले. रा़ष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सबनीसांना चांगलंच फटकारलं. विशेष म्हणजे सगळ्यांचं लक्ष्य लागलं होतं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. मुख्यमंत्री या संमेलनाला येणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. पण मुख्यमंत्र्यांनी संमेलनाला थोड्या उशिरांचे हजेरी लावली.

शरद पवार यांनी सबनीसांच्या निवडीवर बोट ठेवत मत प्रक्रियेचा विचार करा आणि माजी संमेलाध्यक्षांची समिती स्थापन करुन यापुढे संमेलनाध्यक्षाची निवड करा असा सल्लाच दिला. मुख्यमंत्र्यांनीही पवारांच्या सुरात सूर मिसळत साहित्यिकांनी इतरत्र वादात पडू नये, साहित्य संमेलन हे पावित्र्य आहे ते जपा असा टोला लगावला. एवढंच नाहीतर सबनीस यांच्या भाषणाच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी संमेलनातून काढता पाय घेतला. खुद्द सबनीसांनाच मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या कामानिमित्ताने जावं लागलं अशी घोषणा करावी लागली.

सबनीसांनीही आपल्या भाषणात राजकारण्याचा नाद नको अशी भूमिका घेत कानाला खडे लावले. शरद पवारांनी दिलेला सल्ला स्विकारत आभार मानले. देवेंद्र फडणवीस हे सत्तेतले प्रतिनिधी आहे तर मी सत्याचा प्रतिनिधी आहे असं म्हटलं तर वाद नको असंही सबनीस म्हणाले. मी संतांचा चाहता आहे, माझी भूमिका समजून घ्या, ही माझी विनंती आहे असं म्हणत सबनीसांनी पुन्हा एकदा माफीनामा सादर केला. एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनाला हजेरी तर लावली पण हिशेब चुकता करत सबनीसांना चपराक लगावली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close