वैचारिक मतभेद असतानाही वैयक्तिक सलोखा जपावा – शरद पवार

January 17, 2016 3:40 PM0 commentsViews:

äÖÖêîÖêß231

पिंपरी-चिंचवड – 17 जानेवारी : 89 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत हे विशेष आकर्षण ठरलं. काँग्रेसचे नेते उल्हास पवार, कवी फ. मु. शिंदे आणि प्रा. जनार्दन वाघमारे यांनी पवारांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना पवारांनी विविध विषयांवर आपल्या खुमासदार शैलीत मतं मांडली. साहित्य, राजकारण, मराठी भाषा ते थेट वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरील प्रश्नांनाही पवारांनी दिलखुलास उत्तरं दिली.

यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्रिपदी असताना विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसून पवारांनी अनुभवलेला त्यांचा अनेक आठवणींना उजाळा दिला. वैचारिक मतभेद असतानाही वैयक्तिक सलोखा कसा जपावा, हे उदाहरण पवारांनी चव्हाणांच्या किश्शातून सांगितलं. त्यासोबतचं, यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृतपणामुळे महाराष्ट्राला पंतप्रधान मिळाला नाही, असं सांगतांना पवारांचे डोळे पाणावले.

महिला आरक्षणावर बोलताना पवार म्हणाले, की मी संरक्षणमंत्री असताना अमेरिकेच्या दौर्‍यावर गेलो होतो. अमेरिकेत एखाद्या राष्ट्राचा लष्करी प्रमुख येणार असेल तर अमेरिकी लष्कराची तुकडी सन्मानार्थ विमानतळावर हजर असते. मी गेलो तेव्हाही अशीच एक तुकडी उपस्थित होती. तेव्हा मी बघितले, की त्यात अर्ध्या महिला होत्या. भारतात आल्यावर मी तिनही दलाच्या प्रमुखांशी चर्चा केली. लष्करात महिलांसाठी आरक्षण असावे, अशी भूमिका मी मांडली. पण त्यांचा या संकल्पनेला विरोध होता. अखेर तीन महिन्यांनी मी निर्णय घेतला. 15 टक्के आरक्षण लागू केले. त्याचा फायदा वायूदलाचा जास्त झाला. अपघात घटले.

संपत्तीत मुलीला समान वाटा देण्याच्या वादावर शरद पवार मिश्किलपणे म्हणाले, की संपत्तीत मुलीला मुलासारखा वाटा मिळावा यासाठी आम्ही कायदा केला. तेव्हा काही जणांचा त्याला विरोध होता. मी यावेळी काही नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळी मी एका नेत्याला विचारलं, की तुम्हाला किती मुले आहेत. तेव्हा ते म्हणाले, की मला तीन मुलगे आहेत. मी त्यांना सांगितलं, की मग तुम्ही तर जराही विरोध करायला नको. तिघांचे लग्न होणार. सुनांची संपत्ती तुम्हाला मिळणार.

यासंदर्भात आणखी एक आठवण सांगताना पवार म्हणाले, की महिला कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकतात यावर माझा विश्वास आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये क्राईम रेट जास्त होता. अशा ठिकाणी मी महिला आयपीएस अधिकारी पाठवल्या. काही महिन्यात क्राईम रेट कमी झाला. मी एका नेत्याला या विषयी विचारले तर तो म्हणाला, की एखाद्या बाईने रस्त्यात सर्वांमध्ये कॉलर धरली तर इज्जत राहत नाही. या भीतीने गुंडांनी घराबाहेर पडणे बंद केले.

दहावीचा एका हलका फुलका किस्सा सांगताना पवार म्हणाले, की 1958 मध्ये मी दहावी पास झालो. मी अभ्यास करणारा विद्यार्थी नव्हतो. तेव्हा मला कुणीतरी सांगितलं, की सर्व सातही विषयांत 35 टक्के गुण मिळवल्यास सायकल मिळते. त्यामुळे मी केवळ 35 टक्के गुण मिळवले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आलो. माझी आईही शिक्षणाच्या बाबतीत शिस्तिची होती. आम्ही शाळेत जातो की नाही हे ती शाळेत येऊन तपासायची.

दरम्यान, विदर्भासह सीमाभागातील जनतेची मानसिकता आजही मराठीच आहे. त्यामुळे वेगळया विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका लढणार्‍या विदर्भवाद्यांना प्रत्येक निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. तर सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या एकजुटीमुळे इथल्या निवडणुकांमध्ये कायम महाराष्ट्र एकिकरण समितीचे वर्चस्व दिसून येते, असं शरद पवार म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close