बदलापूरमध्ये बिल्डर अमर भाटियांची आत्महत्याच, पोलिसांची माहिती

January 18, 2016 7:14 PM0 commentsViews:

बदलापूर-18 जानेवारी : ठाण्यातील सूरज परमार यांच्या आत्महत्येचं गुढ अजून कायम असताना,ठाण्यात आणखी एका बिल्डरने आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. ठाण्यातील प्रसिद्ध मोहन ग्रुपचे संचालक अमर भाटिया यांनी रेल्वेच्या रुळांखाली येऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हाऊसिंग इंडस्ट्रीत नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Amar Bhatiya231
5000 कोटींची उलाढाल असलेल्या मोहन ग्रुपचे संचालक अमर भाटिया यांचा शनिवारी रात्री बदलापूरजवळ मृतदेह सापडला आणि एकच खळबळ उडाली. हा अपघात आहे की आत्महत्या अशी चर्चा सुरू असतानाच आता पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या अमर  भाटियांनी घरातून निघण्यापूर्वी त्यांच्या मामांना मेसेज करून आत्महत्या करत असल्याचं कळवलं होतं. “मी खूप तणावाखाली असून आत्महत्या करतो आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करा”, असा एसएमएस भाटियांनी आपल्या मामाला केला होता.

अमर भाटियांचा मृत्यू हा आपघाती नसून जरी आत्महत्या वाटत असली, तरीही पोलीस अजूनही सर्व बाजूंनी तपास करत आहेत. डॉक्टरांनीही भाटियांचे व्हिसेरा आणि रक्ताचे नमूने राखून ठेवले असून ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले आहेत.

भाटियांना नेमका कोणता ताण आला होता, हे अजूनपर्यंत पुढे आलं नाहीये. ठाणे जिल्ह्यातल्याच सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर हाऊसिंग इंडस्ट्रीतलं गुपितं उघड होऊ लागली आहेत. त्यातच आता भाटियांच्या मृत्यूमुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close