हैदराबाद विद्यापीठाच्या आवारात संतप्त विद्यार्थ्यांची निदर्शनं

January 19, 2016 2:34 PM0 commentsViews:

952886635-Rohith-Death-Protest_6

19 जानेवारी : हैदराबाद विद्यापीठातला पीएचडीचा दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. बंडारूविरुद्ध काल आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आज विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराबाहेर निदर्शनं सुरू केली आहे.

विद्यार्थी निदर्शनं थांबवत नाहीत हे पाहून आता हैदराबाद विद्यापीठाच्या आवारात संचारबंदी लागू केली आहे. त्याशिवाय विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांचं उपोषण सत्याग्रह अजूनही सुरूच आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाची 2 पथकं हैदराबाद विद्यापीठाच्या परिसरात पोहोचली आहेत. त्यांच्यासमोर विद्यार्थी आपलं म्हणणं मांडणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हैदराबादला गेले आहेत. हैदराबाद विद्यापीठामध्ये त्यांनी निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि रोहितच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

हैदराबाद विद्यापीठातून निलंबित करण्यात आलेल्या रोहित वेमूला या 25 वर्षांच्या दलित विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. बंडारू यांच्या सांगण्यावरूनच रोहित वेमुलाला निलंबित करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमिवर केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि हैदराबाद विद्यापीठाच्या कुलगुरु यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, रोहितच्या आत्महत्येचा निषेध आणि हैदराबाद विद्यापीठात निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी देशासह महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आंदोलन सुरू केली आहे. पुण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही या घटनेचा निषेध करत आज निदर्शनं केली आहेत. तर औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बंद करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्व पक्षांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी दोषींवर कारवाईंची मागणी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close