हैदराबाद प्रकरणी सोलापुरात भाजप वगळता सर्वपक्षियांचा तिरडी मोर्चा

January 20, 2016 7:15 PM0 commentsViews:

solapur_#सोलापूर – 20 जानेवारी : हैदराबाद विद्यापीठात रोहित वेमुला या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर देशभरातील वातावरण पेटलं आहे. सोलापुरातही त्याचे पडसाद उमटले आहेत. रोहितच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या विद्यापीठ प्रशासन आणि राज्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी भाजप वगळता सोलापुरातील सर्व संघटनेच्या युवकांनी सरकारचा तिरडी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.

आज सोलापूर शहरातल्या पार्क चौकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून हा तिरडी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये केंद्रीय मनुष्यबळ आणि शिक्षण मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री बंगारू लक्ष्मण तसंच विद्यापीठाचे कुलगुरू विद्यार्थ्यांना तिरडीवर घेऊन चालले असल्याचे निदर्शनातून सुचवलं. त्यानंतर ही तिरडी यात्रा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना निवेदन देऊन संपविण्यात आली. यावेळी दोषी मंत्री आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना निलंबित करण्याचीही मागणी या युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

तर दुसरीकडे हैदराबाद विद्यापीठामध्ये आजही विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू आहेत. त्याबरोबरच राजकीय नेत्यांच्या विद्यार्थी आणि विद्यापीठाला भेटी आजही सुरू आहेत. सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी, आणि वायएसआर काँग्रेसचे नेते वाय एस जगनमोहन रेड्डी, तसंच
पत्रकार आशिष खेतान विद्यार्थ्यांची भेट घेतली. रोहितनं आत्महत्या केली नाही, ही हत्या आहे अशी टीका येचुरी यांनी विद्यार्थ्यांसमोर
बोलताना केली. आपण इथं विद्यार्थी चळवळीत काम केलेले कार्यकर्ते म्हणून विद्यार्थ्यांसमोर उभे आहोत. राजकीय नेते म्हणून नाही असं येचुरी म्हणाले. दरम्यान, आज सकाळीही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारात निदर्शनं केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close