मुंबईत भरधाव कारने 5 जणांना उडवलं; कारचालकाला अटक

January 22, 2016 9:24 AM0 commentsViews:

Hit and Run in mumbai

मुंबई – 22 जानेवारी : मुंबईत आणखी एक हिट अँड रनची घटना घडली आहे. क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या पाच जणांना उडवल्याची घटना काल रात्री 12.30च्या सुमारास घडली. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कारचालक आमिन युसूफ खान यास अटक केली आहे.

आमिन खान बीएमसीमधील कंत्राटदार असल्याची माहिती समोर येत आहे. सदर कारचालकाची वैद्यकिय चाचणी केली असता तो दारू पिऊन कार चालवत असल्याचे समोर आले आहे. आमिन खानने मर्सडिज बेन्झ या कारने चार जणांना चिरडल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन आज सकाळी त्याला अटक केली. पण पोलिसांकडून अजून चालकाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आधी गुन्हा दाखल करू, मग अटक करू, असं उडवाउडवीचं उत्तर पोलीस देत आहेत.

चालकाचा कारवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येतं असली तरीपण प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, ही कार जे जे हॉस्पिटलहून सीएसटी स्टेशनच्या दिशेने जात होती आणि चालकाल कारवर नियंत्रण करता येत नव्हतं. या अपघाताआधी चालकाने दोन गाड्यांना धडकही दिली होती. कार क्रॉफर्ड मार्केट सर्कल पोहोचताच चालकाचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं आणि रस्त्यावरील पाच जणांना चिरडलं. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याच कळतं.

दरम्यान, आज झालेल्या या घटनेमुळे फूटपाथवर झोपणाऱ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close