आधी रिमोट चार्ज करा, सेनेचा मुख्यमंत्र्यांना टोला

January 25, 2016 1:58 PM0 commentsViews:

uddhav_on_cmमुंबई – 26 जानेवारी : राज्यातल्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला
डिवचलं. त्यानंतर शिवसेनेनं आपल्या मुखपत्र ‘सामना’मधून सडेतोड उत्तर देत आधी हाती रिमोट आहे, पण बॅटरी दुसरीकडे असेल तर काय करायचे? आयसिसला रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची बॅटरी चार्ज होईल असे पाहा असा टोला लगावण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने एसटी कामगार सेनेचा मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांनी रिमोट तुमच्या हातात दिला. आणि तुम्ही राज्याचा रिमोट माझ्या हातात दिला. आता माझ्या हाती राज्याचा रिमोट आहे तर इतर नेत्यांनीही हे लक्षात घ्यावं असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन सेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा ‘सामना’ रंगला. मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावरून ‘सामना’मध्ये टीका करण्यात आली आहे. आणि त्याला संदर्भ जोडण्यात आला आहे तो आयसिस या दहशतवादी संघटनेचा.

मुख्यमंत्र्यांकडे रिमोट कंट्रोल आहे हे बरोबर, पण आयसिसनं महाराष्ट्रात हातपाय पसरून दहशतवादाचा रिमोट कंट्रोल कब्जात घेतला आहे. महाराष्ट्रात पाय रोवून त्यांना हिंदुस्थानचा सीरिया करायचा आहे. सत्तेचा रिमोट ज्यांच्या हाती आहे त्यांनाच हे सर्व रोखावे लागेल. हाती रिमोट आहे, पण बॅटरी दुसरीकडे असेल तर काय करायचे? आयसिसला रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची बॅटरी चार्ज होईल असे पाहा असा टोला सामनातून लगावण्यात आला.

तसंच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा झेंडा फडकवण्याची फडफड नुकतीच केली. या राजकीय फडफडण्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रात आयसिस या भयंकर दहशतवादी संघटनेची पाळेमुळे रुजत आहेत आणि आयसिसनं महाराष्ट्रावर झेंडा फडकवण्यासाठी जे कारस्थान रचले आहे तो प्रकार महाराष्ट्राला अस्थिर आणि असुरक्षित करणारा आहे अशी चिंताही सेनेनं व्यक्त केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close