भाडे नियंत्रण कायद्यावरुन सेनेनं थोपटले भाजपविरोधात दंड

January 27, 2016 10:49 PM0 commentsViews:

sena_vs_bjp342मुंबई – 27 जानेवारी : मुंबईत मोकळ्या भूखंडांचा मुद्दा गाजला आणि शिवसेना अडचणीत आली. आता शिवसेनेने भाडे नियंत्रण कायद्याचा मुद्द्याला हात घातलाय. आणि भाजपला अडचणीत आणलंय. भाडे कायद्यातल्या प्रस्तावित बदलांमुळे मुंबईतल्या पागडी पद्धतीने चाळीत राहणार्‍या भाडेकरूंना बाजारभावाने भाडं द्यावं लागू शकतं. याचा फटका सुमारे 3 लाख लोकांना बसणार आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपविरुद्ध दंड थोपटले आहे.

भाडे नियंत्रण कायद्याचा मुद्द्यावर शिवसेनेनं भाजपविरोधात आंदोलन पुकारलंय. कारण राज्य कॅबिनेटसमोर भाडे नियंत्रण कायद्यातली दुरुस्ती लवकरच येणार आहे. ही दुरुस्ती मंजूर झाली तर चाळीत राहणार्‍या मुंबईकरांना जास्त भाडं द्यावं लागेल. या विरोधात शिवसेनेने सह्यांची मोहीमही हाती घेतलीये.

भाडे नियंत्रण कायदा प्रस्तावित दुरुस्ती

- पागडी पद्धतीने राहणार्‍या भाडेकरूंना बाजारभावाप्रमाणे भाडं द्यावं लागेल
– 800 चौरस फुटांच्या वरची घरं आणि 550 चौरस फुटांवरच्या गाळ्यांना बदल लागू
– दक्षिण मुंबईतल्या सुमारे 3 लाख लोकांना फटका बसू शकतो
– छोट्या खोल्यांमध्ये राहणार्‍या भाडेकरूंना भीती की कालांतराने बदल त्यांनाही लागू होईल

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीनेही या प्रस्तावित बदलांना विरोध केलाय. भाजप धनदांडग्या बिल्डर्सना फायदा करून देण्यासाठी हे दुरुस्ती विधेयक आणतंय, असा आरोप विरोधकांनी केलाय.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता वर्षभरावर आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या मुंबईतल्या अनेक नेत्यांनी या विधेयकाला विरोध
केलाय. भाजप आमदार राज पुरोहित यांनी तर जाहीरपणे विरोध केलाय. पण भाजप एकंदरीत बॅकफुटवर गेलेली पाहून.. भूखंड प्रकरणी 2 पावलं मागे आलेली शिवसेना आता आक्रमक झालीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close