कामचुकार कर्मचार्‍यांना नोकरीवरुन काढा, पंतप्रधान मोदींचे सचिवांना आदेश

January 28, 2016 12:46 PM0 commentsViews:

modi_on_rohitनवी दिल्ली – 28 जानेवारी : बेजबाबदार आणि कामचुकार कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवा, गरज पडली तर नोकरीवरून काढण्याची आणि पेंशनची रक्कम कमी करण्याची शिफारसही करा असे आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सचिवांना दिले. तसंच पंतप्रधानांनी सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचवा, लोकांची काम वेळेत करा अशी कानउघडणीही आपल्या मंत्र्यांची केली.

‘सबका साथ सबका विकास’ असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानापदाची सूत्र हाती घेतली. वेळ प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 26 जानेवारीच्या परेडनंतर पंतप्रधान मोदींनी सर्व सचिवांची चांगलीच झाडाझडती घेतली. पंतप्रधानांनी काल सर्व खात्याचे सचिव आणि राज्यांच्या सचिवांची बैठक घेतली. त्यात त्यांनी एक महत्त्वाची सूचना केली. बेजबाबदार आणि कामचुकार कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवा, गरज पडली तर त्यांच्यावर कडक कारवाई करा असे थेट आदेशच पंतप्रधानांनी दिले. तसंच अशा कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढण्याची आणि पेंशनची रक्कम कमी करण्याची शिफारसही करा. लोकांची कामं झालीच पाहिजेत, असे आदेश मोदींनी सचिवांना दिले. या बैठकीत राज्यांचे मुख्य सचिव व्हिडिओ कॉन्फरेनसद्वारे मोदींशी संपर्क साधत होते.

मंत्र्यांचीही केली कानउघडणी

तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांचीही चांगलीच कानउघडणी केली. पंतप्रधानांनी काल कॅबिनेटची बैठक घेतली. तब्बल 3 तास ही बैठक सुरू होती. पीक विमा आणि उसाचे भाव यावर बैठकीत बरीच चर्चा झाली. सरकारी योजनांची त्वरित आणि परिणामकारक अंमलबजावणी झाली पाहिजे. योजनांचा लाभ जनतेपर्यंत म्हणावा तसा पोहचत नाहीय, असं मोदी म्हणाले. मंत्र्यांनी भाजपबरोबर समन्वय साधावा, आणि खासदारांनी जनतेचा मूड अचून टिपावा, अशी सूचनाही मोदींनी केली. आता दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी कॅबिनेटची आढावा बैठक होणार आहे. कालच्या बैठकीत पाच मंत्र्यांनी आपापल्या कामांचं सादरीकरण केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close