भाडे नियंत्रण कायद्यात कोणताही बदल नाही – प्रकाश मेहता

January 28, 2016 8:32 PM0 commentsViews:

मुंबई – 28 जानेवारी : भाडे नियंत्रण कायद्यात कोणताही बदल होणार नाहीये, असं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. एवढच नाही तर मुळात असा प्रस्तावच नव्हता, अशी सारवासारवही त्यांनी केली आहे. त्यामुळे मुंबईतल्या चाळकर्‍यांच्या डोक्यावरची तलवार सध्यापुरती तरी दूर झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या 3 दिवसांपासून याच मुद्द्यावरून आंदोलन करत असलेल्या शिवसेनेने मात्र हा आमचाच विजय असल्याचं म्हटलं आहे.

Prakash mehta12

मोकळ्या भूखंडांच्या विषयावर बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेला भाडे नियंत्रण कायद्याच्या रूपाने ऐता मुद्दा मिळाला. राज्यातल्या भाजपप्रणीत सरकारचा प्रस्ताव होता की चाळींमध्ये पागडी पद्धतीने राहणार्‍या लोकांनी बाजारभावाप्रमाणे भाडं द्यावं. यामुळे दक्षिण मुंबईतल्या 3 लाख लोकांना फटका बसणार होता. मुख्यमंत्र्यांनी भाडं वाढवण्याचे सुतोवाच देताच शिवसेनेने आंदोलन सुरू केलं. आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा आणि येऊ घातलेल्या बीएमसीच्या निवडणुका पाहता. सरकारने ताबडतोब माघार घेतली. गेले 3 दिवस मूग गिळून गप्प बसलेले भाजपचे नेते एका मागून एक बाहेर पडले आणि हा प्रस्ताव विचाराधीनच नव्हता, अशी सारवासारव करू लागले.

यामुळे मुंबईतल्या सर्वसामान्य चाळकर्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय. पण जर प्रस्ताव विचाराधीनच नव्हता, तर मग भाजपचे नेते 3 दिवस गप्प का बसले, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. दुसरेकडे, हा आमचाच विजय आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

आता महापालिकेची निवडणूक होईपर्यंत तरी हे दुरुस्ती विधेयक पुन्हा येणार नाही. पण त्यानंतर काय, ही टांगती तलवार भाडेकरूंच्या डोक्यावर कायम आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close