हेमामालिनी यांच्या संस्थेला केवळ 70 हजारांत भूखंड!

January 29, 2016 8:28 PM0 commentsViews:

hemamalini759

29 जानेवारी : भाजप खासदार हेमामालिनी यांच्या नाट्य विहार केंद्र या संस्थेला 70 हजार रुपयांत मुंबईतील ओशिवरा इथे मोक्याच्या ठिकाणी असलेला 2 हजार चौरस मीटरचा भूखंड मिळणार आहे. गंभीर बाब म्हणजे उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडाचा लचका तोडून या संस्थेस हा भूखंड दिला जात असल्याची माहिती हाती आली आहे.

हेमामालिनी यांना यापूर्वी वर्सोवा इथल्या न्यू लिंकिंग मार्गावरील भूखंड देण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी 10 लाख रुपयांचा भरणा उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला होता. मात्र या भूखंडाचा काही भाग सीआरझेडबाधित असल्यामुळे बांधकाम करण्यात अडचण होती. भूखंडविषयक नियम आणि अटींनुसार या भूखंडावर करावयाच्या बांधकाम खर्चाच्या 25 टक्के रक्कम शासनाकडे जमा करणं आवश्यक होतं. त्यामुळे हेमा मालिनींच्या संस्थेने या भूखंडाच्या बदल्यात दुसरा भूखंड मिळावा, अशी विनंती 2007 मध्ये केली होती. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर या प्रस्तावावर वेगाने कार्यवाही झाली. त्यानंतर हेमामालीनी यांना अंधेरी-ओशिवरा इथल्या उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडातून संस्थेस 2 हजार चौरस मीटर भूखंड देण्यात आला. पण यावर आता वाद सुरू झाला आहे. 2016 मध्ये हा भूखंड दिला केला जात असताना त्यासाठी शासनाने 1 फेब्रुवारी 1976 च्या मुल्यांकनाचा आधार घेतला आहे. त्यामुळे हेमा मालिनींच्या संस्थेला अल्प दराने हा भूखंड मिळणार आहे

दरम्यान, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी या प्लॉट देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तर हेमामालिनी यांना जागा नियमानुसार देण्यात आली असून 40 वर्षांपूर्वीच्या धोरणानुसार ही जागा त्यांना देण्यात येत असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close