देवनारच्या आगीप्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

January 31, 2016 1:38 PM0 commentsViews:

 

मुंबई – 31 जानेवारी : देवनार डंम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवस धुमसत असलेल्या हजारो टन कचर्‍यामधून बाहेर पडलेल्या वायूने परिसरातील नागरिकांना भोगाव्या लागलेल्या आरोग्याच्या समस्यांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिले होते, त्यानंतर तातडीनं ही कारवाई करण्यात आली.

Deonar

 डंम्पिंग ग्राऊंडवर लागलेली आग शुक्रवारी आटोक्यात आल्याचे वाटत असतानाच मध्यरात्री पुन्हा एकदा धुराचे लोट हवेत पसरू लागलं. दरुगधी आणि काळ्या धुराने परिसरातील नागरिक त्रस्त झाले. शनिवारी पहाटे आगीचे वाढलेले स्वरूप पाहून आयुक्त अजय मेहता यांनी अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिलं. 14 अग्निशामक बंब, पाण्याचे 8 टँकर, 2मिनी वॉटर टेंडर यांच्या मदतीने अग्निशमन दलाचे दीडशे जवान-अधिकारी शनिवारी आग विझवण्याच्या कामाला लागले होते. आग लवकर नियंत्रणात आणण्यासाठी ‘जेल कूल सोल्यूशन’चा पहिल्यांदाच वापर केला गेला. तापमान तातडीने कमी करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. शनिवारी दुपारी आग आटोक्यात आली असली तरीही शनिवारी रात्रीही आग नियंत्रणाचे काम सुरूच ठेवण्याच्या सूचना अग्निशमन दलाला देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देवनार कचरा डेपोला आग लागली त्यामुळे शिवाजीनगर, मानखुर्द, चेंबूर, गोवंडीमधल्या रहिवाशांना याचा त्रास होतोय. हा कचरा डेपो बंद करण्यात यावा यासाठी इथले नागरिक आज रस्त्यावर उतरले. त्यांनी घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या नागरिकांना रास्ता रोको करण्यापासून रोखलं. हा कचरा डेपो बंद झाला पाहिजे अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे. या धुरामुळे संपूर्ण मुंबईच काळवंडली असून देवनार, गोवंडी परिसरातील नागरिकांना धुराचा आणि दरुगधीचा सामना करावा लागत आहे. धुरामुळे गोवंडी, देवनार परिसरातील शाळा बंद ठेवल्या गेल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close