लातूरजवळच्या अनसरवाडामध्ये डोंबार्‍यांना झरे गुरुजींनी दिली नवी ओळख

February 1, 2016 10:05 AM0 commentsViews:

 नितीन बनसोडे, लातूर – 01 फेब्रुवारी :महाराष्ट्रात अनेक समाज अजूनही वेशीबाहेर जगत आहेत. “जेवण शिजवून खायचं असतं का?”,असा प्रश्न तुम्हाला कोणी केला तर तुम्ही आवाक झाल्याशिवाय राहणार नाही! मात्र महाराष्ट्रात अशा अनेक जाती आहेत, ज्यांना अजूनही स्व:ताच जेवणही बनविण्याची सवय झाली नाहीय! घर, शाळा, अंघोळ, विज, आरोग्य या सुविधापासून हे आजही वंचित आहेत. गेल्या अनेक पिढ्यापासून हे सर्व आपल्या समाजाचा भाग असले तरी त्यांना अजून लोकशाहीत ओळखच मिळालेली नाहीये! पण हे ही दिवसही बदलतायत आणि असा बदल घडवणारी माणसंही कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता आपली वाटचाल चालुच ठेवतायत.

Dombara samaj

लातूरपासून मैलाच्या अंतरावर असलेला अनसरवाडा…डोंबार्‍याची वस्ती…अंग मेहनतीचे खेळ दाखवून… भिक्षा मागून हा समाज पोटाची खळगी भरतो. बरोबरीने कमालीची अंधश्रद्धा, जात पंचायतीचा पगडा. घर, आरोग्य, शिक्षणापासून हा समाज आजही खुप दुर आहे. मात्र एका शिक्षकाने ही परिस्थिती बदलली आहे.

डोंबार्‍यांच्या या वस्तीला झरे गुरुजींनी “गोपाळखेळकरी” अशी ओळख मिळवून दिली. स्व:ताचं नाव आणि गाव नसलेल्या या समाजाला झरे गुरुजींनी नवी ओळख द्यायच ठरवलं. सुरुवातीला काही मोजक्या लोकांच प्रबोधन केलं. त्यांना खर्‍या अर्थाने जीवन जगायला शिकवल. स्वयंपाक, अंघोळ, शेतीकामापासून नमस्कार-रामरामही शिकवला.

फक्त जगण्यासाठीचे शिक्षण नाही तर लिहायला वाचयला येण्यासाठी मराठीच शिक्षण देणं हे गरजेचं होतं. या वस्तीचा आता कायापालट झालीये. मागून खाणारे हात आत तांदूळ शिजवतात… मणी ओवण्यापासून सुरू झालेलं काम आता पायपूसण्या तयार करण्यापर्यंत आलंय.

वस्तीतल्या मुलांना गुरुंजीनी बँडच प्रशिक्षण दिलं. आज या वस्तीत जिल्हाभर प्रसिद्ध असलेली नऊ बँड पथकं आहेत. वर्षाकाठी अडीच लाखाची कमाई होते. एवढच नाही तर दारू, गांजा ही व्यसनं हा आता इतिहास आहे. नव्याने स्थायिक कुंटुबांना गुरुंजीच्या आचारसंहितेतून जावं लागतंय.

महिला बरोबरच मुलंही आता स्वच्छतेचे धडे गिरवायला लागलीयेत. गावकरी आणि झरे गुरुजींच्या प्रयत्नातून इथं जिल्हा परिषदेची प्रार्थमिक शाळाही सुरू झालीय.

भटक्या समाजाला एकत्रित आणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झरे गुरुजींच्या कार्याला गावकरीही साथ देत आहेत. आता या समाजाला खर्‍या अर्थानं राष्ट्रीयत्व मिळालंय. या गावकर्‍यांना आणि झरे गुरुजीच्या प्रयत्नाला IBN लोकमतचा सलाम.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close