मुरुड समुद्रकिनार्‍यावर काळा सोमवार, 13 विद्यार्थी बुडाले

February 1, 2016 6:11 PM0 commentsViews:


murud_beachरायगड – 01 फेब्रुवारी :: जिल्ह्यातील मुरुड जंजिरा बीचवर आजचा दिवस हा काळा सोमवार ठरलाय. समुद्रकिनार्‍यावर 13 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून करुण अंत झालाय. या दुर्घटनेत 10 विद्यार्थिनी आणि 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 5 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत एक विद्यार्थी बेपत्ता आहे. हे सर्व विद्यार्थी पुण्यातील होते.

आज सकाळी पुणे येथील अबिदा इनामदार कॉलेजच्या विद्यार्थ्याची सहल मुरूडला आली होती. तीन बसमधून जवळपास 126 विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मुरूडला पोहोचले होते. दुपारी मुरूडला पोहोचल्यानंतर यातील काही जण जेवणासाठी हॉटेलमध्ये थांबले होते तर काही विद्यार्थी तौसाळकर वाडीच्या मागे असलेल्या समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र,समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आणि समुद्राला भरती असल्याने पोहता न येणारे हे विद्यार्थी पाण्यात खेचले गेले. विद्यार्थांचा आक्रोश पाहुन स्थानिक मच्छिमार मदतीसाठी धावून आले. त्यांनी तीन-ते चार जणांना वाचवलं पण 13 विद्यार्थ्यांना वाचविण्यात त्यांना यश आले नाही. 13 विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले असून त्यात 10 मुलींचा समावेश आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्राला भरती असतांना पोहण्यास मनाई केली जाते. आजही असंच घडलं. स्थानिकांनी या मुलांना हटकलं होतं. पण, तरीही पोहण्यासाठी 25 जण समुद्रात उतरले. भरतीच्या लाटांमुळे किनार्‍यावरची वाळू समुद्रात सरकली आणि या वाळूसोबतच विद्यार्थी समुद्रात ओढले गेले आणि बुडाले. अद्याप समुद्रकिनारी गर्दी असून यातील सात मुलांचा शोध सुरू आहे. पोलिसांचं आणि तिथल्या स्थानिकांचं बचावकार्य सुरू आहे. शोध मोहिमेत कोस्ट गार्ड, स्थानिक पोलीस, महसूल यंत्रणा सहभागी झाली आहे.

काय घडलं नेमकं ?

मुरुड समुद्र किनार्‍यावर विद्यार्थी नेमके भरतीवेळी पोहायला गेले
स्थानिकांनी विरोध करूनही मुलं समुद्रात उतरली
भरतीच्या लाटांमुळे किनार्‍यावरची वाळू समुद्रात सरकली
वाळूसोबतच विद्यार्थी समुद्रात ओढले गेले आणि बुडाले
आतापर्यंत 13 विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले
मृतांमध्ये 10 मुली, 3 मुलांचा समावेश
7 विद्यार्थी अजूनही बेपत्ता
25 जण समुद्रात पोहायला उतरले होते
आतापर्यंत 5 जणांना वाचवण्यात यश

 

मुरुड दुर्घटनेतील मृतांची नावं
-शिफा काझी
-सुमय्या अन्सारी
-युसूफ अन्सारी
-सना मुन्वीर
-सुप्रिया पाल
-फरीन सय्यद
-इप्तिकार शेख
-साजीद चौधरी
 -राज तांजिनी
-स्वप्नाली संगत
-समरीन शेख
-साफिया अन्सारी
 -राफिया अन्सारी

 

विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

- रायगडमध्ये समुद्रकिनार्‍यांवर जीवरक्षकच नाहीत
- रायगड जिल्ह्याला 240 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे
- जीवरक्षकांसाठी कोणतीही तरतूद जिल्हा प्रशासनाकडे नाही
- किनार्‍यावर सूचना फलक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनानं निधी उपलब्ध केला नाही
- दुर्घटनेप्रसंगी नेव्ही आणि कोस्टगार्डची मदत घ्यावी लागते
- समुद्रकिनार्‍यांच्या देखभालीचं काम ग्रामपंचायतींकडे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close