आमचे सचिव बदला, मंत्रालयात मंत्री आणि ‘बाबू’मध्ये शीतयुद्ध !

February 3, 2016 10:28 PM0 commentsViews:

प्रफुल्ल साळुंखे,मुंबई – 03 फेब्रुवारी : मंत्री आणि सचिवांच्या भांडणात अनेक विभागात फाईलींचा ढिगारा साचलाय. आमचे सचिव बदला, असा धोशा आता अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे लावला. पण या विभागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्जीचे सचिव नेमल्याचा आरोप अऩेक मंत्री करतायत. मंत्र्यांमधले वाद सोडवण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांची डबा पार्टी केली. पण डबा पार्टी करून समस्या सुटतील कशा, असा प्रश्न मंत्री खासगीत विचारत आहे.

mantri vs sachiv

राज्यातल्या मंत्र्यामंत्र्यामध्ये सुसंवाद निर्माण व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी शक्कल लढवली. त्यांनी मंगळवारी सगळ्या मंत्र्यांना डबा पार्टी करण्याचे आदेश दिले. एकत्र बसून सगळ्या मंत्र्यांनी हसत खेळत डबे खालले खरे, पण डबा पार्टीपेक्षा आमच्या विभागाचे सचिव बदलले तर सुसंवाद निर्माण होईल, असे टोमणे काही मंत्र्यांनी नंतर लगावल्याचं कळतंय. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्री आणि सचिवांमधील वाद आता टोकाला गेलाय.

मंत्री विरुद्ध सचिव

अर्थ विभाग – सुधीर मुनगंटीवार X सुधीर श्रीवास्तव
महसूल विभाग – एकनाथ खडसे X मनुकुमार श्रीवास्तव
पर्यावरण विभाग – रामदास कदम X मालिनी शंकर
समाजकल्याण – राजकुमार बडोले X उज्ज्वल उके
आदिवासी विभाग – विष्णू सावरा X राजगोपाल देवरा
अन्न-नागरी पुरवठा – गिरिष बापट X दीपक कपूर
गृहनिर्माण – प्रकाश मेहता X श्रीकांत सिंग
शालेय शिक्षण – विनोद तावडे X नंदकुमार

आपल्या पेक्षा मातब्बर नेत्याच्या खात्याचा सचिव आपल्या मर्जीतला नेमण्याची शक्कल अनेक मुख्यमंत्र्यांनी लढवली. त्यावेळी मंत्र्यांनी सर्व कारभार रेटून नेला. पण या सरकारमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण आणि स्थापन झालेले नागरी सेवा मंडळ या मुळे मंत्र्यांपेक्षा आयएएस अधिकाऱयांची लॉबी स्ट्राँग झालीय.

मंत्री गिरीष बापट, प्रकाश मेहता आणि रामदास कदम यांचे आणि त्यांच्या सचिवांमध्ये होणारे वाद जाहीर झालेत. तर समाजकल्याण आणि आदिवासी कल्याण मंत्री यांनी अशी तक्रार केलीये की ते फक्त शोभेचे मंत्री राहिलेत.

सचिवांनी होकार दिलेली फाईल मंत्री नाकारतात. आणि मंत्र्यांनी पाठवलेली फाईल सचिव पुढे सरकवत नाहीत. त्यामुळे राज्याच्या कामाचा वेग मंदावलाय. याकडे लवकर लक्ष नाही दिलं, तर आमचा स्फोट होऊ शकतो, असाही इशारा.. कॅमेरासमोर न येता बोलणारे हे मंत्री देत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close