कायदेमंडळाला काम करायला आवडत नाही, अणेंची राजकारण्यांवर पुन्हा टीका

February 5, 2016 8:50 PM0 commentsViews:

Aney123नागपूर – 05 फेब्रुवारी : महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून खळबळ उडवलीय. कायदेमंडळाला काम करायला आवडत नाही, शक्य असतं तर ते संपावरही गेले असते, अशा शब्दांत अणे यांनी टीकेची झोड उडवलीय. कायदेमंडळ, न्यायपालिका आणि प्रशासन हे लोकशाहीतले तीन महत्वाचे स्तंभ आहेत. पण यातील कायदेमंडळ आणि प्रशासन त्यांची जबाबदारी योग्य तर्‍हेनं पार पाडत नसल्याचं अणे यांनी म्हटलंय. रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या वतीने आयोजित जनहित याचिका या विषयांवरील व्याख्यानात ते बोलत होते.

कायदेमंडळाला काम करायला आवडत नाही. त्यांना संपावर जाणं शक्य असतं तर ते गेलेही असते. उदाहरण देतो. मी एक विधान केलं. स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे म्हणून 2 आठवडे हे कायदेमंडळ माझ्या विधानावर चर्चा करत होते. माझ्या विधानावर तुम्हाला आक्षेप असण्याचा हक्क आहे. पण नागपुरात तुम्हाला ज्या कामासाठी पाठवलं आहे, ते तर करा. जनतेचा पैसा त्यावर खर्च होतो. मग काय होतं, कायदेमंडळ आपलं कर्तव्य पार पडत नाही, आणि मग कोर्टाला मध्ये पडावं लागतं. कोर्टाला कायदेमंडळाचं काम करावं लागतं असा टोलाही त्यांना राजकारण्यांना लगावला. यापूर्वीही वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर बोलून अणे यांनी वाद निर्माण केला होता.

दरम्यान, श्रीहरी अणे यांना पदमुक्त करण्याची मागणी करणारं पत्र विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close