मराठी टायगर्स – एक फसलेला ‘सीमा’प्रश्न

February 6, 2016 7:17 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

मराठी टायगर्स… जबरदस्त टायटल, पोस्टरवर रांगडा अमोल कोल्हे आणि प्रोमोमधून दिसतं महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचं धगधगतं वास्तव.. आता हे सगळं शोरुममध्ये सजवलेलं असलं तरी आतमध्ये भलताच प्रकार आहे. सध्या या सिनेमावरुन सीमाभागात बराच वादंग सुरु आहे. ज्या कलाकृतीला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालंय, त्याला रोखण्याचा किंवा बंदी घालण्याचा कोणालाही अधिकार नाही. बेळगावमध्ये हा सिनेमा रिलीज होऊ देणार नाही असं म्हणणार्‍या संघटनांचा निषेधच केला पाहिजे. पण त्याचबरोबर सीमावासियांच्या भावनांशी खेळून भडक बटबटीत ढिसाळ प्रेमकहाणी बनवणं याच्यावरही बोललं गेलं पाहिजे. अर्थात, या सिनेमाच्या बाजूनं उभं राहणार्‍या सीमाभागातील मराठी जनांना सिनेमा बघितल्यावर आपली किती मोठी फसवणूक झालीये याची जाणीव होईलच आणि मग तेव्हा कपाळावर हात मारण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसेल.

काय आहे स्टोरी ?

marathi_tigears3प्रत्यक्षात या सिनेमात सीमाप्रश्न हा अगदीच तोंडी लावण्यापुरता आहे. पोस्टर आणि होर्डिंगवर अमोल काल्हे दिसतोय, पण मुख्य नायक महेश दादा या नावाच भलताच कुणीतरी आहे. या सिनेमापेक्षा सीमाप्रश्न किती ज्वलंत आहे हे ‘झालाच पाहिजे’ या नाटकातून कितीतरी चांगल्याप्रकारे आलेलं होतं. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी गेल्या सहासष्ट वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. न्यायालयात खटले सुरू आहेत. आज सीमाभागातल्या लोकांच्या भावना तीव्र आहेत, या कशाचाही विचार न करता सीमा असं नाव असलेल्या नायिकेची प्रेमकहाणी सिनेमात आहे.

आता तुमच्या लक्षात आलं असेल की यात नेमका कोणता ‘सीमा’प्रश्न आहे ते… लोकांच्या भावनांचा अजिबात विचार न करता, कोणतंही गांभीर्य न ठेवता, पूर्ण सिनेमाभर स्वत:ला रजनीकांत समजणार्‍या महेशदादाचा सुमार अभिनय सहन करावा लागतो. मग मध्येच कधीतरी अमोल कोल्हे आणि विक्रम गोखले येऊन सीमाप्रश्नाबद्दल काहीतरी बोलतात आणि मग पुन्हा लव्हस्टोरी सुरू… सगळाच संतापजनक प्रकार असला तरी असे सिनेमे बनवणं हा अजूनतरी आपल्याकडे गुन्हा नसल्यामुळे सगळं खपून जातं, हे आपलं दुदैर्व…

नवीन काय ?

marathi_tigears34एकूणाच सिनेमात सगळा आनंदीआनंदच आहे, हतबलपणे सिनेमा बघत बसणं यापलीकडे आपल्या हातात काहीच उरत नाही आणि आपण एवढी सहिष्णुता दाखवत असूनही आपली दया यांना येत नाही, कारण क्लायमॅक्समध्येही फारसं काही घडत नाही. महेश दादा या कलाकारामुळे, बाष्कळपणामुळे, आयटम साँगमुळे, उगाच मध्येच आलेल्या रोमँटिक गाण्यामुळे, अभिनय कशाशी खातात हे माहित नसलेल्या अनेकांमुळे, अशा अनेक कारणांमुळे डोक्याचा भुगा झालेल्या अवस्थेतच आपण थिएटरबाहेर पडतो. शेवटी अमोल कोल्हे आणि विक्रम गोखले यांना विनंती करावीशी वाटते, तुम्हाला अशा सिनेमात बघायला प्रेक्षकांना खरंच आवडत नाही.

रेटिंग 100 पैकी 20


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close